अकोट : शहरालगत एका फार्महाऊसवर रंगीन पार्टी करणे व त्यानंतर प्रशासनाद्वारा झालेली हलगर्जी चांगलीच भोवरणार असल्याची शक्यता आहे. ‘त्या’ ओल्या पार्टीतील युवकांसह इतर काही जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ओल्या पार्टीसंदर्भात प्रशासनाने कायदेशीर कागदोपत्री कारवाई करून सर्वांना मोकळे सोडून दिले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक शहरालगत अंजनगाव मार्गावरील फार्महाऊसवर दि. १८ एप्रिल रोजी उशिरा रात्रीपर्यंत एका युवकाची मित्रासोबत वाढदिवसानिमित्त ओली पार्टी सुरू होती. या गोपनीय माहितीवरून घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना त्याठिकाणी १५ ते २० जण पार्टी करताना आढळून आले. वाढदिवासानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करताना युवक दिसून आले. या प्रकरणात अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, पार्टीमध्ये सहभागी युवकांचा व त्यांच्या कुंटुबातील सदस्यांची कोरोना चाचणी करणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाने हलगर्जी करीत त्यांना सोडून दिले होते. दरम्यान, दि.१ मे रोजी पार्टी करणाऱ्यांपैकी काही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी काही मोठे व्यावसायिक आहेत. वास्तविक पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीमुळे आणखी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.