बाळापूर: देगाव येथे जागा नावाने करण्यासाठी मारहाण करून मुलाने वडिलाचा खून केल्याचे ११ जानेवारी रोजी तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपीला मदत करणाऱ्या मोठ्या सुनेविरुद्धही बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोघांनीही वृद्ध पित्याचा गाय व गोºह्याने मारल्याने मृत्यू झाल्याचा बनाव केला होता.वाडेगाव येथील गंगाधर पंढरी म्हैसने (७०) यांचा २२ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्यांचा मुलगा विठ्ठल गंगाधर म्हैसने याने बाळापूर पोलिसात आपल्या वडिलांना गाय, गोºह्याने मारल्याने ते जखमी झाले होते व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद बाळापूर पोलिसात दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली. तसेच गंगाधर म्हैसने यांच्या उत्तरीय तपासणीच्या अहवालात गायीने जखमा होण्याची शक्यता कमी असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी कसून चौकशीस सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी शेजारी राहणाºया लोकांची विचारपूस केली असता २२ डिसेंबर २०१८ रोजी विठ्ठल म्हैसने याने आपल्या वडिलांना मारहाण केल्याचे समोर आले. तसेच त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या संध्या म्हैसने हीनेही गंगाधर म्हैसने यांना मारहाण केल्याचे तपासात समोर आले. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गंगाधर म्हैसने यांचा २२ डिसेंबर २०१८ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे बाळापूर पोलिसांनी ११ जानेवारी रोजी विठ्ठल म्हैसने व संध्या म्हैसने यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)