अकाेला : खदान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील निमवाडी येथे ५ डिसेंबर २०२० राेजी एका वृध्दाचा मृतदेह आढळल्यानंतर खदान पाेलिसांनी तपास करताना या वृध्दाची हत्या करणाऱ्या त्याच्या जावयास भुसावळ येथून अटक केली. काैटुंबिक कलहातून ही हत्या केल्याचे समाेर आले असून पाेलिसांसमाेर त्याने कबुली दिल्याची माहिती आहे.
चांदूर येथील रहिवासी श्रीराम बाबूराव सपकाळ यांची ५ डिसेंबर राेजी रात्री निमवाडी परिसरात अज्ञात मारेकऱ्यानी त्यांची हत्या केली हाेती. निमवाडी येथे एका वृध्दाचा मृतदेह असल्याची माहिती खदान पाेलिसांना मिळाली. या माहितीवरून खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेष सपकाळ, खदानचे ठाणेदार डी. सी. खंडेराव यांनी तातडीने पंचनामा करून आराेपीचा शाेध सुरु केला. दरम्यान, पाेलिसांना मिळालेल्या माहितीवरून श्रीराम सपकाळ यांची हत्या त्यांचा जावई कापशी येथील रहिवासी मनाेज शिवचरन इंगळे याने केल्याचे समाेर आले. यावरुन पोलिसांनी मनाेजचा शाेध सुरु केला असता ताे मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली. पाेलिसांचे पथक त्याच्या शाेधासाठी मुंबई येथे गेले. मात्र नंतर ताे नागपूर येथे असल्याची माहिती समाेर येताच पाेलिसांनी त्याचा नागपूर येथे शाेध घेतला. मात्र ५० दिवसांचा कालावधी उलटल्यावरही ताे सापडत नसल्याने पाेलिसांनी नव्याने तपास सुरु केला. या दरम्यान आराेपी शिवचरण इंगळे हा भुसावळ येथे असल्याची माहिती मिळाली. यावरुन पालिसांचे एक पथक तातडीने भुसावळ येथे रवाना करण्यात आले. या पथकाने आराेपीला पाहताच अटक करण्यासाठी सापळा रचला. आराेपी शिवचरण इंगळे हा फरार हाेण्याच्या तयारीत असतानाच त्याला खदान पाेलिसांनी अटक केली. आराेपीला अकाेला येथे आणण्यात आले असून त्याला न्यायालयासमाेर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई खदान पाेलीस स्टेशनचे ठाणेदार डी. सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.