लोकमत न्यूज नेटवर्कमहान : महान येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये येत असलेल्या बिहाडमाथा येथे जावयाने सासूचा खून केल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.बिहाडमाथा येथील रहिवासी विधवा महिला प्रमिला भगवान आठवले (४५) यांची मुलगी दीपाली हिचे लग्न आगरा येथील मुन्नेश निमकाडे (३५) यांच्यासोबत लावण्यात आले असून, दीपाली हिला मुन्नेशपासून दोन मुली झालेल्या आहेत. आरोपी मुन्नेश निमकाडे व दीपाली यांच्यात काही वर्षांपासून पटत नव्हते. मुन्नेश ला दारुचे व्यसन असून, तो दीपालीला नेहमी मानसिक व शारीरिक त्रास द्यायचा. या कारणास्तव दीपाली गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दोन्ही मुलीला घेऊन आगर्यावरून माहेरी महान येथे आली होती. आई विधवा असून, घरची परिस्थिती ठीक नसल्याने ती शेतात मजुरी करून आपल्या दोन्ही मुलींचे पालन पोषण करायची. आरोपी मुन्नेश हा वर्षातून दोन ते तीन वेळा आगर्यावरून महानला भेटीसाठी यायचा. इथे आल्यावरसुद्धा तो सासू व पत्नी दीपालीला अतोनात त्रास द्यायचा. चार दिवसांपूर्वी आरोपी मुन्नेश हा महान येथे आला होता. १२ ऑक्टोबर रोजी रात्री दारू पिऊन तो पत्नी दीपालीसोबत वाद घालीत असता, पत्नी दीपाली घरातून निघून शेजारी गेली असता, मुन्नेशसुद्धा घराबाहेर पडला. घरात केवळ दीपालीची आई प्रमिला आठवले ही झोपलेली होती. रात्री सुरू असलेल्या पावसात मुन्नेश हा बाहेरून घरात आला असता, त्याने पत्नीच्या रागात सासू प्रमिला आठवले हिच्या तोंडावर, नाकावर लाथा बुक्कय़ांनी वार केल्याने प्रमिलाचा नाक व तोंडातून रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. आरोपी मुन्नेश हा तेथून मध्यरात्रीच पसार झाला.रात्री पाऊस सुरू असल्याने प्रमिलाचा ओरडण्याचा आवाज बाहेर कोणालाच ऐकू आला नाही. सकाळी दीपाली घरात गेली असता, तिला आई प्रमिलाचे तोंड साडीच्या पदराने झाकलेले दिसले . तिने तोंडावरील पदर काढला असता प्रमिलाचा चेहरा रक्ताने माखलेला दिसला; परंतु तोपर्यंत प्रमिला आठवलेची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती दीपालीने बाश्रीटाकळी पोलिसांना १३ ऑक्टोबर रोजी दिल्यावरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. आरोपी मुन्नेश निमकाडेविरुद्ध गुन्हा दाखल करून बाश्रीटाकळी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
श्वानपथक दाखल आरोपीने केलेल्या खुनाचा तपास करण्यासाठी बिहाडमाथा, महान येथे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील, पीएसआय सोनोने, चव्हाण यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळावर दाखल होता.