अकोला : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध प्रचार करणार्या आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंवर लवकरच कारवाई होणार आहे. मूर्तिजापूर मतदारसंघातून प्रतिभा अवचार यांनी केलेल्या बंडखोरीची माहिती पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आली आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी तुटल्याने दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीवरून प्रचंड रस्सीखेच झाली. कॉँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी पक्षांतर करून उमेदवारी पदरात पाडून घेतली. मात्र कोणत्यातच पक्षातून उमेदवारी न मिळालेले काही जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असून, काही पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध प्रचार करीत आहेत. त्यामुळे तीन दिवसांपूर्वीच कॉँग्रेसने पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात प्रचार केल्याप्रकरणी १0 आजी-माजी पदाधिकार्यांना निलंबित केले होते. यानंतर आता कारवाईचे सत्र आता राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही सुरु होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य प्रतिभा अवचार या अपक्ष म्हणून मूर्तिजापूर मतदारसंघातून रिंगणात उतरल्या आहेत. प्रतिभा अवचार यांनी २00९ च्या विधानसभा निवडणुकीत मूर्तिजापूर मतदारसंघातून राकॉँ तिकिटावर निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. नवख्या उमेदवार असूनही त्यांनी मूर्तिजापूर मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना दिलेले लढत बघता यावेळी पुन्हा त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयापासूनच त्या या मतदारसंघात सक्रिय झाल्या होत्या. आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना मूर्तिजापूरमधून तिकिट नाकाली. तसेच पक्षश्रेष्ठींकडून त्यांना तिकिटा मागे घेण्याबाबत सूचना देण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे आता पक्षाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्षांनीन त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविला आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही लवकरच कारवाईचे सत्र !
By admin | Published: October 09, 2014 1:37 AM