अकोला : जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी लवकरच पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता पारंपरिक पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सार्वत्रिक १४८ ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीवर १६ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप व हरकती संबंधित तहसील कार्यालयात स्वीकारण्यात येतील. त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.
पोटनिवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींची अशी आहे संख्या!
जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यात ८, अकोट तालुक्यात ११, मूर्तिजापूर तालुक्यात ४९, अकोला तालुक्यात १३, बाळापूर तालुक्यात १८, बार्शिटाकळी तालुक्यात २८ व पातुर तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.