अकाेला : काेराेनाची सबब पुढे करीत मनपा प्रशासनाने जनता भाजीबाजारात भाजीपाल्याची हरासी व विक्री करण्यावर निर्बंध आणले हाेते. तरीही काही व्यावसायिकांनी अवैधरीत्या भाजीबाजार सुरू ठेवल्याची तक्रार मनपाकडे करण्यात आली हाेती. प्राप्त तक्रारीला केराची टाेपली दाखवणाऱ्या महापालिका प्रशासनाची पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी कानउघाडणी करताच बुधवारी सायंकाळी आयुक्त संजय कापडणीस यांनी जनता भाजीबाजारातील हरासीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.
जनता भाजीबाजाराच्या जागेवर वाणिज्य संकुलाचे आरक्षण आहे. या जागेवर संकुलाची उभारणी करण्यासाठी मनपास्तरावर हालचाली सुरू झाल्या असून, त्या अनुषंगाने भाजीबाजारात व्यवसाय न करण्याचे निर्देश मनपाने दिले हाेते. ही बाब लक्षात घेत काही भाजीपाला व्यावसायिकांनी नवीन किराणा मार्केटच्या मागील लाेणी रस्त्यावर जागा खरेदी करीत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. मनपाचे निर्देश पायदळी तुडवित काही व्यावसायिकांनी जनता भाजीबाजारात हाेलसेल व किरकाेळ विक्री सुरूच ठेवली हाेती. यामुळे लाेणी मार्गावरील व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले हाेते. याप्रकरणी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने बाजार बंद करण्यासाठी काेणत्याही हालचाली केल्या नाही म्हणून व्यावसायिकांना जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर साखळी उपाेषण करावे लागले. ४ जानेवारी राेजी अकाेल्यात दाखल झालेले पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी लाेणी मार्गावरील भाजी विक्रेत्यांची बाजू लक्षात घेऊन मनपा प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली.
रात्री बंद,दिवसा सुरू!
जनता भाजीबाजारात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत हाेलसेल तसेच किरकाेळ भाजीपाला तसेच फळ विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सकाळी ६ नंतर भाजीबाजार पूर्ववत सुरू ठेवता येईल. दरम्यान, प्रशासनाने जारी केलेल्या आदेशाचे कितपत पालन हाेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.