अकोला : कोरोनाच्या बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाव्यतिरिक्त इतरही गंभीर आजारांची लक्षणे उपचारादरम्यान आढळून आली आहेत. या आजारांवर उपचारासाठी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता असेलच हे सांगणे शक्य नाही. अशा वेळी ‘टेलीआयसीयू’च्या माध्यमातून संबंधित आजाराचे विशेषज्ञ थेट रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांच्या मदतीने रुग्णावर उपचार करू शकतात. लवकरच हे तंत्रज्ञान अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपयोगात आणले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी आरोग्य यंत्रणेसोबत झालेल्या आॅनलाइन बैठकीत ‘टेलीआयसीयू’बद्दल माहिती दिली. त्यानुसार, मुंबईसह राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला जाणार आहे. यामध्ये अकोला जिल्ह्याचाही समावेश असून, लवकरच हे तंत्रज्ञान येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपयोगात येणार आहे. हे तंत्रज्ञान कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा ‘टेलीआयसीयू’ या तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यास राज्यातील इतर जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णावर उपचार करू शकणार आहे. त्यामुळे संबंधित आजारावर विशेषज्ञ उपलब्ध नाही, म्हणून रुग्णावर उपचार शक्य नाही या विचारधारेला यापुढे फाटा बसणार असून, आॅनलाइन माध्यमातून विशेषज्ञ थेट रुग्णाशी संवाद साधून स्थानिक डॉक्टरांना उपचारासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
अकोल्यात लवकरच ‘टेलीआयसीयू’द्वारे उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 6:17 PM