अकाेला : अतिक्रमण हटाव माेहिमेला सुरुवात हाेत नाही ताेच खुले नाट्यगृहाजवळ एका महिला व्यावसायिकेने हातात दगड उचलून ताे भिरकावण्याचा प्रयत्न केला. त्यावर मनपाच्या महिला सुरक्षारक्षकांनी महिला व्यावसायिकेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. महिला ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे पाहून मनपाच्या महिला सुरक्षारक्षकही त्याच पद्धतीने भिडल्या. यावेळी वाहनातून खाली उतरत आयुक्त निमा अराेरा यांनी कारवाईदरम्यान असहकार्य व असभ्यपणा कदापि खपवून घेणार नसल्याचा इशारा देत साहित्य जप्तीचे निर्देश दिले.
मुख्य रस्त्यालगतच्या लघु व्यावसायिक व फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई केली जाईल, ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली हाेती. त्यामुळे बहुतांश व्यावसायिकांनी दुकाने मांडलीच नाहीत. मुख्य मार्गावरील अतिक्रमणाचा सफाया करताना अनेकांचा विराेध माेडीत काढण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने शास्त्री स्टेडियममागे चक्क रस्त्यात भंगार साहित्य खरेदीची व दुचाकी विक्रीची दुकाने लावणाऱ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविण्यात आले. दीपक चाैकातील रेडक्राॅस साेसायटीलगतच्या खुल्या शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. मानेक टाॅकीज ते टिळक राेडवरील व्यावसायिकांनी दुकानाबाहेर उभारलेले साहित्य जप्त करण्यात येऊन दुकानांचे ओटे, पायऱ्या व टिन पत्र्यांचे शेड ताेडण्यात आले.
आयुक्त म्हणाल्या बग्गी ताब्यात घ्या!
श्रीराम द्वारसमाेर रस्त्यालगतची बग्गी हटविण्यास पहेलवान व्यावसायिकाने नकार दिला. त्यावेळी ही बग्गी ताब्यात घ्या, अशी सूचना आयुक्त अराेरा यांनी करताच व्यावसायिकाने बाचाबाची करीत अखेर ही बग्गी हटवली.
सायंकाळी ४ नंतर पुन्हा कारवाई
आयुक्त अराेरा यांनी सकाळी साडेअकरा वाजता कारवाईला प्रारंभ केला. दुपारी २ वाजता गांधी चाैकातील चाैपाटीवरील अतिक्रमकांना हुसकावण्यात आले. यादरम्यान, काही व्यावसायिकांनी पुन्हा दुकाने थाटल्याची माहिती मिळताच सायंकाळी ४ वाजता आयुक्त निमा अराेरा पुन्हा रस्त्यावर उतरल्या. सायंकाळी सव्वासहापर्यंत कारवाई सुरू हाेती.