दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या सोपीनाथ महाराजांचा यात्रा महाेत्सव सोमवार, २२ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. यात्रा महाेत्सवात खंड पडू नये म्हणून कोरोनाचे सावट असतानादेखील रविवारी सायंकाळीच शेकडाे भाविक मंदिर परिसरात दाखल झाले असून, त्यांनी राहुट्या उभारून मंदिर परिसरातच मुक्काम ठाेकला आहे. काेराेना प्रतिबंधासाठी शासनाच्या निर्देशानुसार साेपीनाथ महाराजांचे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मात्र भाविकांनी मंदिर परिसरात आठवडाभर थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
सोपीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष गुलाबराव ताले यांनी मंदिराचा दरवाजा बंद केला असून, या ठिकाणी शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येत असून, चाेख पाेलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. कोणीही व्यापारी वर्ग या ठिकाणी दुकान मांडण्यासाठी मज्जाव करणार नाही, असे सांगण्यात आले आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी लाकूड आडवे बांधून व शामियाना टाकून रेषा आखण्यात आल्या आहेत. तसेच या मंदिरात दर्शन घेतले तर परत त्याच रस्त्याने न जाता दुसऱ्या बाजूने रस्ता काढण्यात आला आहे. या मंदिरावर जवळपास शेकडो भाविक भक्त हजर झाले आहेत. तसेच या मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कोणीही विना मास्क फिरू नये, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.