सर्वप्रथम महाव्यवस्थापकांनी अकोला रेल्वे स्थानकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत वृक्षारोपण केले. त्यानंतर त्यांनी शिवानी शिवापूर रेल्वे स्थानकावरील सुविधा, माल धक्का आदींची पाहणी केली. उपस्थित अधिकाऱ्यांसोबत स्थानक तसेच माल धक्का इत्यादीच्या विकास कार्यक्रमाची चर्चा केली.
या दौऱ्यात माल्या यांच्यासोबत नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंघ, आर. धनंजयलु, संजीव अगरवाल, एम. रवींद्रनाथ रेड्डी आदी उपस्थित होते.
भाजप शिष्टमंडळाने मांडल्या मागण्या
माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या सूचनेवरून भाजपच्या एका शिष्टमंडळाने गजानन माल्या यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विविध मागण्या मांडल्या. रेल्वे स्थानकावर सुविधा वाढविण्यासोबतच, आरओबीचा विस्तार, अकोला ते खंडवा गेज परिवर्तनाच्या कामात येत असलेले तांत्रिक व कायदेशीर अडथळे दूर करून हे काम तातडीने पूर्ण करणे, तापडिया नगर येथील उड्डाणपूल, अकोट स्थानकावरून दक्षिण भारतासाठी गाड्या सुरू करणे आदी मागण्यांबाबत शिष्टमंडळाने माल्या यांच्यासोबत चर्चा केली. या शिष्टमंडळात रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य तथा भाजपचे कोषाध्यक्ष वसंत बाछुका यांच्यासह गिरीश जोशी, संजय जिरापुरे, ॲड. सुभाष सिंह ठाकूर उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधींचे वावडे
अकोला स्थानकावर आलेल्या माल्या यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, माध्यमांचे प्रतिनिधी व सामाजिक व प्रवासी संघटनांनी वेळ मागितली. परंतु, माल्या यांनी भेटण्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नव्हे, तर माध्यम प्रतिनिधींना छायाचित्र काढण्यासही मनाई केली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतची तक्रार खासदार संजय धोत्रे यांच्याकडे केली. संजय धोत्रे यांनी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर भाजप शिष्टमंडळाला भेटण्याची परवानगी देण्यात आली.