संतोषकुमार गवई
पातूर : गत दहा ते अकरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यात ४५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २८ हजार ७८० हेक्टरवर पेरणी आटोपली असून, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. ते शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येणाऱ्या चार ते पाच दिवसांत पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
पातूर तालुक्यात जवळपास ३० हजार क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. पेरणी केल्यानंतर काही भागात पाऊस झाल्याने पेरलेले बियाणे अंकुरल्याने शेते बहरलेली आहेत. मात्र, गत दहा ते अकरा दिवसांपासून तालुक्यातील काही भागात पाऊस न झाल्याने पिके धोक्यात आली आहेत. जमिनीतील ओल, अधिक पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी उडीद, मूग, सोयाबीन, कपाशी, आदी पिकांची पेरणी पैशांची जुळवाजुळव करून केली. मात्र, पावसाने दडी दिल्याने पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. सतत चार वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
-------------
पेरणीचा खर्च वाया जाण्याची भीती
येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस न आल्यास पेरणीचा खर्च वाया जाण्याची भीती परिसरातील शेतकऱ्यांना आहे. पावसाअभावी पिके पूर्णपणे करपून गेल्यास दुबार पेरणीशिवाय पर्याय उरणार नाही. दुबार पेरणीची वेळ आली तर महागाडे बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. यामुळे सध्या पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
-------------------------
तालुक्यात पीकनिहाय पेरणी क्षेत्र
सोयाबीन १९५५०
कपाशी ४५००
मूग ६४०
उडीद ६८०
तूर २९७५
ज्वारी ५६०
एकूण २८७८०
----------------------------------------------
मृग नक्षत्रात पाऊस आल्याने पेरणी केली. त्यानंतर पावसाने दडी दिल्याने पिके कोमजू लागले आहेत. सध्या पावसाची प्रतीक्षा आहे.
-संतोष इंगळे, शेतकरी, भंडारज बु.
-----------------------------
पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. जर तीन ते चार दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.
-एम.एम. इंगळे, शेतकरी, आगिखेड.