वाशिम जिल्ह्यात १० ते १३ जूनदरम्यान मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरीवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पावसापूर्वीच अनेक शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपून पेरणीची तयारी केली. यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांची खरेदीही करून ठेवली आहे; परंतु मृग नक्षत्राच्या पावसाने १० जून रोजीच रुद्र रुप धारण केले. सतत दीड तास पाऊस कोसळला. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले, तर नदी, नाल्याकाठी असलेल्या शेतात पाणी शिरून अनेकांची जमीन खरडून गेली. तसेच अनेकांच्या शेतात पाणीही साचले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्यातही खोळंबा निर्माण झाला आहे. दरम्यान, गुरुवार १० जून रोजी सायंकाळी ४ वाजल्यानंतर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अडाण, मडाण नदीला पूरही आला होता. या पुरामुळेच अडाण प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढला आणि अडाण प्रकल्पाच्या दोन दरवाजांतून ३ सेंटीमीटरचा विसर्गही करावा लागला.
-
खरडलेल्या जमिनीचे पंचनामे प्रलंबित
जिल्ह्यात ८ ते १० जूनदरम्यान आलेल्या जोरदार पावसाने काही शेतकऱ्यांची शेतजमीनच खरडून गेली. या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा खर्च करून मशागत करीत शेती पेरणीसाठी तयार केली होती. परंतु, पावसामुळे जमीनच खरडून गेल्याने आता ती जमीन पुन्हा पेरणीयोग्य करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे. या नुकसानाबाबत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तथापि, अद्यापही काही खरडलेल्या जमिनीचे पंचनामे पूर्ण होऊ शकले नाहीत.