व्याळा (अकोला): यावर्षी खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाल्यानंतरही शासनाने नजर अंदाज आणेवारी ७0 टक्के जाहीर केल्याच्या पृष्ठभूमीवर बाळापूर तालुक्यातील व्याळा मंडळाची आणेवारी केवळ ११.३४ टक्के आली आहे. रविवारी करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगातून ही आणेवारी समोर आली आहे.तालुका प्रशासनाच्यावतीने रविवारी व्याळा मंडळात सोयाबीन व ज्वारी पीक कापणी प्रयोग करण्यात आला. यावेळी सोयाबीनच्या प्लॉटमधून एकरी एक क्विंटल ८ किलो उत्पन्न झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या पिकाची आणेवारी ११.३४ पैसे एवढीच भरते. तसेच ज्वारी पिकाचे उत्पादन एकरी ५ क्विंटल ७२ किलो एवढे झाल्याचे दिसून आले. ही पैसेवारी केवळ ४६ टक्के एवढी भरते. यावर्षी तालुक्यात ज्वारीचा अत्यल्प पेरा असून, मोठय़ा क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. त्यामुळे सोयाबीनची आणेवारी महत्त्वाची आहे. सोबतच कपाशी पिकाचीही आणेवारी ३0 पैशांपर्यंत आहे. प्रत्येक पीक कापणी प्रयोगाच्यावेळी बाळापूर उपविभागीय अधिकारी राम लठाड, तहसीलदार समाधान सोळंके, माजी कृषी सभापती पंढरीनाथ हाडोळे, नायब तहसीलदार डी. एन. डांगे, मंडळ अधिकारी महाजन, कृषी अधिकारी दिलीप देशमुख, शशिकिरण जांभरूणकर, तलाठी भगत, प्रशांत बुले, रंगारी, अजिज अहमद, बेंडे, जयपिले, सरपंच श्रीकृष्ण पागधुने, कान्हेरी सरपंच तितुर, पुरुषोत्तम मांगटे, अनिल गिर्हे, शिवाजी पाटील, रमेश पाटील, सावळे यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
व्याळा मंडळात सोयाबीनची आणेवारी फक्त ११ पैसे
By admin | Published: November 10, 2014 1:10 AM