- राजरत्न सिरसाट (अकोला)
अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरू आहे. बुधवारपर्यंत सरासरी नऊ हजार क्विंटल आवक होती. बाजार बंद होताना शनिवारी ही आवक सहा हजार क्विंटलपर्यंत खाली आली आहे. तिळाचे दर मात्र वाढले असून, दर प्रतिक्विंटल ११,५०० रुपये झाले आहेत. यादिवशी आवक मात्र केवळ एक क्ंिवटल होती.
मागील आठवड्यात सोयाबीन काढणीला सुरुवात झाली. उतारा मात्र जमिनीच्या प्रकारानुसार आहे. हमीदराने सोयाबीन खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढले. मागच्या आठवड्यात जवळपास प्रतिदिन ३५ क्विंटल आवक होती. या आठवड्यात आवक घटली. बुधवारी सोयाबीनचे सरासरी दर ३,१०० रुपयांवरून आता प्रतिक्विंटल २,९९० रुपये होते. प्रतवारीच्या निकषानुसार शेतकऱ्यांना २,५०० रुपयेच दर मिळत आहे. काढणी हंगाम सुरू होण्यापूर्वी सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र सुरू करणे क्रमप्राप्त होते. तथापि, केंद्र सुरू नाहीत. शेतकऱ्यांना कमी दरात म्हणजे ४,३५० ते ४,८०० रुपये प्रतिक्ंिवटल दरानेच विक्री करावी लागत आहे.
उडीदही जैसे थे आहे. शनिवारी मूग २४८ क्विंटल, तर उडीद ३२४ क्विंटल, हरभऱ्याची आवक ४९९ क्विंटल एवढी होती. दर मात्र ३,५०० ते ३,७७५ रुपये प्रतिक्विंटल होते. तुरीचे दरही प्रतिक्विंटल ३,४०० ते ३,५५० रुपये आहेत. आवक २४३ क्विंटल होती. स्थानिक ज्वारीचे दर प्रतिक्विंटल १,२०० ते १,२५० रुपये होते. आवक केवळ १३ क्ंिवटल होती. स्थानिक गहू १,७५० ते १,७९० रुपये प्रतिक्विंटल होता. बाजार बंद होताना आवक मात्र ३१ क्विंटल होती. शरबती गहू २,३५० ते २,४०० रुपये प्रतिक्विंटल होता. आवक २५ क्विंटल होती. सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजाराककडून काही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असताना तशी काही चिन्हे दिसत नसल्याचे चित्र आहे.