अकोला : मृगधारा बरसताच शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठीची लगबग सुरू आहे; पण बहुतांश शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने पीक कर्जासाठी बँकेसमोर रांगा लागल्या आहेत. पश्चिम विदर्भात यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. शेतकरीही सोयाबीन बियाण्यांनाच पसंती देत आहेत. कपाशीचे बियाण्यांची आतापर्यंत २५ टक्केच मागणी आहे; पण खरेदी संथ आहे.पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यात सर्वाधिक १३ लाख हेक्टर सोयाबीन दुसºया क्रमांकावर कपाशी आहे. याकरिता महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आणि सर्व खासगी कंपन्या मिळून ४ लाख १२ हजार १२ हजार १०६ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. आतापर्यंत १ लाख ७५ हजार क्विंटलवर सोयाबीन बियाण्यांची विक्री झाली असल्याचा कृषी विभागाचा दावा आहे. कापसाची मागणी मात्र घटली आहे. याच विभागात ५७ हजार ९१२ पाकीट कपाशी बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. यातील आतापर्यंत ३० टक्क्यांवर पाकीटची विक्री झाली आहे. या भागात शेतकरी सोयाबीन, कापूस पिकात तूर हे आंतरपीक घेतात. यावर्षी ३८ हजार ४०६ क्विंटल तूर बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यापैकी २५ टक्के विक्री झाली आहे.