अकोला: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरज भागविण्यासाठी शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्या सोयाबीनची आवक वाढली आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात सतत पाऊस आणि परतीच्या पावसाने जिल्ह्यात यंदा मूग व उडीद पिकाचे उत्पादन बुडाले असून, सोयाबीनच्या उत्पादनातही घट झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवकचे प्रमाण कमी होते परंतु दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खर्च भागविण्याकरिता गरज म्हणून सोयाबीन विकण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढल्याचे वास्तव सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बघावयास मिळाले. सद्यस्थितीत बाजार समितीत ३ हजार ४४० ते ४ हजार २०० रुपये प्रती क्विंटल दराने अडत्यांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात येत असून, दिवाळी साजरी करण्यासाठी गरज म्हणून मिळेल त्या भावात सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.