अकोला : ऑगस्ट महिन्यात आलेल्या पावसाने विदर्भातील ६0 टक्के सोयाबीन पिकांची वाढ झाली आहे. सोयाबीनच्या झाडांना पुरक फुलोरा येत नसल्याचे चित्र असून, अचानक या पिकावर अनोळखी कीड आल्याने शेतकरी हादरले आहेत. या नवीन किडीने शास्त्रज्ञांपुढेही आव्हान उभे केले आहे. दीड महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाल्याने सोयाबीनसह इतर पिकांची वाढ झाली असली तरी चांगले उत्पादन येण्यासाठी या झाडांना पुरक फुलोरा येणे गरजेचे आहे; परंतु यावेळी सोयाबीनच्या झाडांना पुरक फांद्या, शाखा वाढल्या नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. विदर्भात जवळपास १८ लाख हेक्टरच्यावर शेतकर्यांनी सोयाबीनची पेरणी केली; पण लगेच पावसाने दडी मारल्याने जवळपास ७0 टक्के पिकांना फटका बसला. शेकडो शेतकर्यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागला. दुबार पेरणी केलेले पीक आले, पण या पिकांना फुलोरा येण्यासाठी एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यासाठी पुन्हा पावसाची गरज भासणार आहे. दरम्यान, यंदा पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने शेतकरी हतबल झाला असताना सोयाबीन पिकावर विविध किडींनी हल्ला केला आहे. हेलीकोर्व्हेपा या किडीने तर उच्छाद मांडला असून, नुकतीच अमरावती जिल्हय़ात नवी कीड कृषी अधिकार्यांच्या निदर्शनात आली आहे. अकोला व अमरावती जिल्हय़ातील काही भागातील सोयाबीन पिवळे पडले असून, पिवळा मोझ्ॉक या रोगामुळे या भागातील सोयाबीनची पाने पिवळी झाली आहेत. नत्राच्या कमतरतेमुळे पानातील हरितद्रव्ये कमी झाल्याने पाने पिवळी पडतात. अनेक ठिकाणी हिरवी उंट अळी निदर्शनास आली आहे. या अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास पिकाचे नुकसान होणार असल्याने शेतकर्यांना कीटकनाशकांचा खर्च करावा लागणार आहे.
सोयाबीन वाढले, पण फुलो-याचे प्रमाण घटले!
By admin | Published: August 18, 2015 1:32 AM