अतुल जयस्वाल /अकोला : निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी सोयाबीनसह खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले आहे. घरात आलेले सोयाबीन सणा-सुदीचे दिवस तोंडावर आल्यामुळे शेतकर्यांनी विक्रीसाठी काढले असून, बाजारपेठेत आवक वाढताच दरही झपाट्याने खाली उतरत आहेत. नाइलाजाने मिळेल त्या दरातही सोयाबीनची विक्री करावी लागत असल्यामुळे शेतकर्यांचा हिरमोड होत असून, सोयाबीनच्या विक्रीतून गाठीशी पैसा शिल्लक उरत नसल्याची खंत ते व्यक्त करीत आहेत. गत दोन ते तीन वर्षांपासून निसर्ग सातत्याने शेतकर्यांची परीक्षा घेत आहे. कधी अतवृष्टी, तर कधी अवर्षण यामुळे गत तीन वर्षांपासून खरीप हंगाम शेतकर्यांना हुलकावणी देत आहे. यावर्षी जिल्ह्यात २ लाख २९ हजार ९६0 हेक्टर क्षेत्रावर शेतकर्यांनी सोयाबीनची लागवड केली. सुरवातीपासूनच पावसाने दगा दिल्यामुळे सोयाबीनसह खरिपातील सर्वच पिकांची परिस्थिती जेमतेम राहिली. मूग, उडीद हातचे गेल्याने शेतकर्यांना सोयाबीनपासून अपेक्षा आहे; परंतु यावर्षी सोयाबीनच्या उतार्यात प्रचंड घट येत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकरी दोन ते तीन क्विंटलचा उतारा येत आहे. दसरा व दिवाळी हे सण तोंडावर आले असताना शेतकरी त्यांचा माल अकोला येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सोयाबीनला या मोसमातील सर्वोच्च ३९५0 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे हुरूप वाढलेल्या शेतकर्यांनी मोठय़ा प्रमाणात माल विक्रीसाठी काढला आहे. या महिन्यात ५00 क्विंटलपासून सुरू झालेली सोयाबीनची आवक १0 हजार क्विंटलच्या घरात पोहोचली आहे. चालू महिन्यात आतापर्यंत ६0 ते ६२ हजार क्विंटल सोयाबीन बाजार समितीत आल्याची माहिती अधिकार्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
सोयाबीनची आवक वाढली; भाव घसरले!
By admin | Published: October 22, 2015 1:50 AM