- राजरत्न शिरसाट (अकोला)
कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथे सोयाबीनच्या दरात चालू आठवड्यात दीडशे ते दोनशे रुपयांनी घट झाली असून, शुक्रवारी हे दर प्रतिक्ंिवटल ३१०० ते ३२०० रुपयांपर्यंत खाली आले. कापसाचे दरही कमी झाल्याने दर वाढतील या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
यावर्षी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात विलंब झाला असून, अद्याप पूरक खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत; पण मागील महिन्यात बाजारातील दर प्रतिक्ंिवटल ३३५० रुपयांपर्यंत वाढले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. शासनाने सोयाबीनचे आधारभूत दर ३३९९ रुपये प्रतिक्ंिवटल जाहीर केलेले आहेत. बाजारात प्रतिक्ंिवटल सरासरी ३३५० रुपये शेतकऱ्यांना मिळत होते, तोपर्यंत चिंता नव्हती. आता दरात घट सुरू झाली असून, दर वाढतील, या प्रतीक्षेत बाजारातील सोयाबीनची आवकही घटली आहे.
शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८५७ क्ंिवटल सोयाबीन विक्रीस आले होते. या आठवड्यात ही सरासरी आवक आहे. मागच्या महिन्यात हीच आवक सरासरी चार हजार क्ंिवटल एवढी होती. हे दर स्थिर राहतील, अशी शक्यता व्यापारी वर्तुळात असल्याची माहिती अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुनील मालोकार यांनी दिली. सोयाबीनचे दर पुन्हा वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे. अनेक शेतकऱ्यांनी घरातच ठेवले आहे. राज्याच्या कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीनचे दर प्रतिक्ंिवटल पाच हजार रुपयांपर्यंत जातील, अशी शक्यता वर्तविली होती. त्यामुळे शासकीय धोरणात बदल होऊन दर वाढतील, ही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
कपाशीची आधारभूत किंमत प्रतिक्ंिवटल कापसाच्या आखूड, लांब धाग्यानुसार ५१५० ते ५४५० रुपये होती; पण मागच्या महिन्यात हे दर आधारभूत दरापेक्षा ५०० ते ६०० रुपयांनी वाढले होते. हे दर दिलासादायक असल्याने शेतकऱ्यांनी जोरात कापूस विक्री केली. तथापि, डिसेंबर महिन्यात कापसाचे दर अचानक घटले असून, प्रतिक्विंटल ५०० ते ६०० रुपयांनी कमी झाल्याने कापसानेही शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.अनेक शेतकऱ्यांनी अजून भाव वाढतील या आशेने घरातच कापूस साठवून ठेवला आहे. भाव कमी झाल्याने या शेतकऱ्यांचा पुरता हिरमोड झाला असून पुन्हा भाव कधी वाढतील याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत.
दरम्यान, तीळ या तेलबिया पिकाच्या दरात या आठवड्यात आणखी वाढ झाली आहे कारण, तिळसंक्रांत हा सण जवळ आला असून या सणामध्ये तिळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यासाठी व्यापाऱ्यांनीही तिळाची साठवण करणे सुरू केले आहे. मागील महिन्यात प्रतिक्ंिवटल ११५०० रुपये जे दर होते, ते चालू आठवड्यात १२५०० रुपये म्हणजेच १००० रुपयांनी वाढले आहेत; पण तिळाची आवक खूपच कमी असून, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ एक क्ंिवटल आवक होती. उडदाची प्रतिक्ंिवटल ४५०० रुपये, मूग ५१०० रुपये तूर ४४०० रुपये तर हरभऱ्याचे प्रतिक्ंिवटल सरासरी ४१५० रुपये आहे.