अकोला : या वर्षी सोयाबीनच्या दराने विक्रमी दर गाठले. या दरात वाढ अद्यापही कायम आहे. खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांजवळ शेतमाल शिल्लक नाही. बाजार समितीत आवक कमी आहे; परंतु सोयाबीनच्या दरात तेजी कायम आहे. सोयाबीनला ७७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे; मात्र हरभऱ्याचे दर हमीदराच्या खाली आले आहेत. गतवर्षी सोयाबीन उत्पादक देशांमध्ये या शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनची मागणी वाढली. परिणामी, सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी आली आहे. गत सहा महिन्यांपासून सोयाबीनच्या दरातील तेजी कायम आहे. काही महिन्यांपूर्वी अकोला येथील बाजार समितीत सोयाबीनचे दर ८ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले होते. मध्यंतरी या शेतमालाच्या दरात थोडी घसरण होऊन सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ६८०० ते ७००० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले होते; परंतु आता पुन्हा या शेतमालाच्या दरात तेजी आली असून, सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ७,५०० रुपयांच्या वर पोहोचले आहेत. जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोमवारी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेतून हे स्पष्ट झाले आहे.
बाजार समितीत शेतमालाची स्थिती
शेतमाल आवक दर (प्रति क्विंटल)
सोयाबीन ३७६ ७७००
हरभरा २०८ ४५००
तूर ४९७ ६१००
शेतकरी म्हणतात...
गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पीक खराब होऊन पडलेल्या दरात विकले. आता दर चांगले आहे; परंतु हे दर दोन-तीन महिने कायम राहिल्यास फायदा होईल.
- वासुदेव कवळकार, शेतकरी, खिरपुरी
यंदा सोयाबीनचे पीक चांगले दिसून येत आहे. निसर्गाची अवकृपा न झाल्यास उत्पन्नही चांगले होईल; मात्र आता सोयाबीनला मिळणारे हे दर पुढील शेतमाल हाती येईपर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे.
- अमोल पाटील, शेतकरी, शिरसोली
राखून ठेवलेल्या सोयाबीनची विक्री
खरीप हंगामात पीककर्जाला विलंब होत असताना हाती शिल्लक ठेवलेले सोयाबीन विकून शेतकरी शेतामधील निंदण, खुरपणासह खत देण्यासाठी पैशांची व्यवस्था करीत आहेत. त्यामुळे आता बाजार समित्यांत सोयाबीनची आवक सुरू आहे.