मागील खरिपात शेवटच्या काळामध्ये सोयाबीनच्या दरात चांगलीच वाढ पहावयास मिळाली होती. दर दहा हजारांच्या पुढे गेले होते. या कारणामुळे यंदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परिणामी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली आहे. यंदा सुरुवातीला पावसाने साथ दिल्याने पीकही जोमात आले. त्यातच मुहूर्ताला ११ हजार ५०१ रुपयांपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र दोन दिवस होत नाही तोच दरात घसरण सुरू झाली. गत आठ दिवसांमध्ये २३०० रुपयांनी दर घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढली आहे.
आवकही कमी, भाव पडले!
ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीला कमी कालावधीत येणारे वाण पेरले आहे, त्यांची काढणी आता सुरू आहे. शेतकरी बाजारात सोयाबीन घेऊन येत आहेत. आवक कमी प्रमाणात असलीतरी भावामध्ये मात्र घसरण सुरू झाली आहे. नवीन सोयाबीन बाजारात आले, त्यावेळेस जवळपास आठ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. मात्र, हळूहळू हा दर घसरत ५५०० पर्यंत आला आहे.
काढणीचा खर्च वाढला!
सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू झाला आहे; परंतु यंदा काढणी खर्च वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. गतवर्षी सोयाबीन काढणीचा खर्च हा एकरी दोन हजारांपासून अडीच हजारांपर्यंत येत होता. यावर्षी हा खर्च तीन हजारांपर्यंत येत आहे. शेतकरीवर्गाने हा वाढवून येणाऱ्या खर्चासाठीही तजवीज केली. मात्र, बाजारात मालाचे भाव पडले आहेत.
..असे घसरले दर
१५ सप्टेंबर ७८००
१६ सप्टेंबर ७०००
१७ सप्टेंबर ७५००
१८ सप्टेंबर ७०००
२० सप्टेंबर ७२००
२१ सप्टेंबर ६५००
२२ सप्टेंबर ५५००
आर्द्रतेचे प्रमाण अधिक
बाजारात आता आवक सुरू झाली आहे. त्याचवेळी भाव पडतायत. काही दिवसांनंतर आवक वाढणार आहे. त्यावेळी काय दर राहतील, अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे. सध्या येणाऱ्या नवीन सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.