- संजय खांडेकरअकोला: आंतरराष्ट्रीयस्तरीय बाजारपेठेत सोयाबीनला मागणी वाढताच देशात सोयाबीनचे भाव तीन हजार रुपये क्विंटलच्या पलीकडे सरकत आहेत. तीन हजार रुपयांच्या पलीकडे सोयाबीनचे भाव वधारताच देशभरात सोयाबीनची साठेबाजी वाढली आहे. सोयाबीनला आणखी भाव मिळण्याचे संकेत जाणकारांकडून मिळत असल्याने ‘एनसीडीईएक्स’कडे १३७१५८ क्विंटल सोयाबीनचा साठा गोळा झाला आहे. यातही देशात सर्वांत जास्त सोयाबीनचा साठा अकोल्यात असल्याची नोंद आहे.गत आठवड्याभरापासून सोयाबीनचे भाव सातत्याने वधारत आहेत. ३०००-३५०० रुपयांच्या पलीकडे सोयाबीनला भाव मिळत असल्याने सोयाबीन बाजारपेठेत येण्याऐवजी सोयाबीन साठविले जात आहे. नॅशनल कॉमेडिटी अॅण्ड डेरीव्हेटिव्ह एक्सजेंच्या बाजारात कास्तकार आणि व्यापाऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे. यामध्ये अकोल्यातील गोदामात ३६२६४ क्विंटल साठा गोळा झाल्याची नोंद आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी सोयाबीनचे भाव २५००-२७०० रुपये क्विंटलच्या घरात असल्याने शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर होता; मात्र गत आठवड्याभरापासून सोयाबीनचे भाव वधारत आहेत. सोयाबीनचे भाव वधारताच अकोला, इंदूर, कोटा, लातूर, मनसूर, नागपूर, सागर, शुजालपूर आणि विशादा येथील ‘एनसीडीईएक्स’च्या गोदामातील साठा वाढला आहे. २३ जानेवारीपर्यंत ‘एनसीडीईएक्स’कडे १३७१५८ क्विंटल साठा गोळा झाल्याची नोंद आहे. अकोलापाठोपाठ सोयाबीनची साठेबाजी करणाºयांमध्ये इंदूर आणि कोटाचा क्रम लागतो.
- इराणमधून सोयाबीनला मोठी मागणी आहे. अलीकडे नवीन करारावरदेखील स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवसांत सोयाबीनचे भाव चार हजार रुपये क्विंटलपर्यंत जाण्याचे संकेत आहेत.-वसंत बाछुका, उद्योजक, अकोला.