राजरत्न सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असून, हे दर प्रतिक्विंटल २,८२५ रुपयांपर्यंत पोहोचले. केंद्र शासनाने सर्वच प्रकारच्या खाद्य तेल आयातीवर शुल्क वाढ केल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापार्यांचे मत आहे; पण बाजारातील सोयाबीनची आवक मात्र घटली आहे.यावर्षी राज्यात ३७ लाखांवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. विदर्भात हे क्षेत्र १७ लाख हेक्टरवर आहे. विदर्भात सुरुवातीला पाऊस लांबल्याने या पिकावर त्याचे प्रतिकूल परिणाम झाले आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. अनेक भागात एकरी ३ ते ४ क्विंटल उतारा येत असून, काढणीचे दर मात्र यावर्षी प्रचंड वाढल्याने शेकडो शेतकर्यांनी शेतातून सोयाबीन न काढता शेत नागरल्याचे प्रकार घडले.दरम्यान, यावर्षी सोयाबीनचे हमीदर २ हजार ८५0 रुपये आहेत. २00 रुपये बोनस मिळून शेतकर्यांना ३ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटल मिळणार आहेत; पण काढणी हंगामाच्या सुरुवातीला बाजारात दोन हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे सोयाबीनची खरेदी करण्यात आली होती. हातात पैसाच नसल्याने अल्पभूधारक शेतकर्यांनी सुरुवातीलाच सोयाबीनची विक्री केली. तेव्हा बाजारात दररोज सात ते आठ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होते. आजमितीस दोन हजार ते दोन हजार पाचशे क्विंटलची आवक सुरू आहे. राज्यात सोयाबीनची सर्वाधिक उलाढाल असलेल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजमितीस दररोज २ ते २ हजार ५00 क्विंटलची आवक सुरू आहे. शुक्रवारी ही आवक २,५२३ क्विंटल होती. यामध्ये दररोज घसरण होत आहे. शुक्रवारी या बाजारात सोयाबीनचे सर्वाधिक दर प्रतिक्विंटल २,८२५ तर सरासरी दर २,६४0 पर्यंत पोहोचले होते. या हंगामातील हे दर सर्वाधिक आहेत.
अल्पभूधारक दरापासून वंचितअल्पभूधारक शेतकर्यांनी अगोदरच सोयाबीन विकल्यानंतर आता सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे. तेल आयातीवर सुरुवातीलाच शुल्क वाढवले असते, तर अल्पभूधारक शेतकर्यांनाही दराचा फायदा झाला असता, अशा प्रतिक्रिया शेतकर्यांमध्ये उमटत आहेत.
तेलाच्या आयातीवर शुल्क वाढविल्याने सोयाबीन दरात वाढ झाली असून, या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. - वसंत बाछुका, तेल, कापूस उद्योजक, अकोला.