लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सोयाबीनचे दर वाढताच शेतकर्यांनी वेअर हाऊसमध्ये तारण ठेवलेले सोयाबीन विक्रीला काढले असून, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत आजमितीस दररोज सरासरी दोन हजार क्विंटल सोयाबीनची आवक सुरू आहे. सर्वच प्रकारच्या खाद्य तेलावर केंद्र शासनाने दुप्पट आयात शुल्क वाढविल्याचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मागील वर्षी जिल्हय़ात दोन लाख हेक्टरच्यावर शेतकर्यांनी सोयाबीन पेरणी केली होती. पण, पाऊस कमी झाल्याने सोयाबीन पिकाला सर्वात जास्त फटका बसला. एकरी सरासरी एक ते दीड क्विंटलच उतारा लागला, काही ठिकाणी तर एकरी ३0 ते ५0 किलो एवढेच उत्पादन झाले. पैशाची नितांत गरज असल्याने अल्पभूधारक शेतकर्यांनी सुरुवातीलाच अल्पदरात सोयाबीन विक्री केली. काही शेतकर्यांनी दराच्या प्रतीक्षेत वेअर हाऊसमध्ये सोयाबीन तारण ठेवले; परंतु ते मोजकेच होते. २0१६-१७ मध्ये मात्र शेतकर्यांनी ३३,९0३ क्विंटल शेतमाल तारण ठेवला. त्यामध्ये अध्र्यांच्यावर सोयाबीन होते. गत दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर कमी असल्याने शेतकर्यांनी सोयबीन वेअर हाऊसमध्येच ठेवले होते. यावर्षी सर्वच तेलाच्या आयातीवर केंद्र शासनाने दुप्पट आयात शुल्क लावल्याने तेलवर्गीय शेतमालाचे दर वाढताना दिसत असून, सोयबीनचे दर ३,१७५ रुपये प्रतिक्विंटलने वाढले आहेत. हे दर हमी दरापेक्षा ७५ ते १00 रुपयांनी वाढले आहेत.
दरम्यान, हंगामाच्या सुरुवातीला गतवर्षी सात हजार क्विंटलच्यावर सोयाबीनची आवक होती, यावर्षी ती चार-पाच हजार क्विंटलपर्यंत आली होती. त्यानंतर सोयबीनची आवक एक ते दीड हजार क्विंटलच्या आत होती, पण मागील आठवडा संपताना सोयाबीनचे दर वाढले असून, आवकही दोन हजार क्विंटलपर्यंत पोहोचली. १२ जानेवारी रेाजी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १,९९४ क्विंटल सोयाबीन आवक झाली.
मागील वर्षी पाऊस नसल्याने सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटल्याने २0१६-१७ च्या तुलनेत शेतकर्यांनी अत्यंत कमी सोयाबीन तारण ठेवले होते. पण, अगोदर तारण ठेवलेले सोयाबीन शेतकर्यांनी विक्रीला काढले आहे. सध्या बाजारात हमीदरापेक्षा थोडा जास्त भाव शेतकर्यांना मिळत आहे.
- शिरीष धोत्रे, सभापती,
कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.