गतवर्षी ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आल्याने उत्पादनात घट आली. राज्यभरात आणि देशातही अशीच स्थिती असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना, घाणा आणि चीनसह इतर काही देशांतही सोयाबीनचे उत्पादन घटले. त्यामुळे सोयाबीनच्या मागणीत अचानक वाढ झाली. त्यामुळेच जिल्ह्यात पाहता-पाहता सोयाबीनचे दर ४ हजार रुपये प्रतिक्विंटलहून १० हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले. प्रत्यक्षात या दरवाढीचा शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी सुरुवातीला काही प्रमाणात सोयाबीन खरेदी करून ठेवले. त्यांचा थोडाफार फायदा झाला, तर शेकडा दोन ते पाच टक्के शेतकऱ्यांना सोयाबीनच्या सर्वोच्च दराचा लाभ चांगलाच झाला. मात्र केंद्र सरकारने विदेशातून सोयाबीनची आयात करण्याचा निर्णय घेतल्याने दर घसरले. जवळपास १०-१५ दिवस ही घसरण सुरूच होती. चार-पाच दिवसांपासून दराने पुन्हा उसळी घेतली आहे.
पाम तेलाच्या जैव इंधनात जागतिकस्तरावर मागणी वाढल्याने खाद्यतेलाच्या किमती जास्त आहेत. तसेच कोविडमुळे उत्पादन कमी असल्याने कामगार कमी असून, चीनकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे दर जागतिक पातळीवर अधिक असल्याने स्थानिक दरात वाढ झाली आहे.
- ब्रिजमोहन चितलांगे, व्यापारी
मोठमोठ्या मल्टिकॉर्पोरेट ग्रुपच्या कमोडिटीकडे मार्केट गेल्याने सोयाबीनच्या तेजी-मंदीवर यांची पकड आहे. तसेच उत्पादनात घट झाल्याने बाजारात मागणीही आहे. त्याचाही दरावर परिणाम होत आहे. गत काही दिवसांआधी सोयाबीन आयात केल्याच्या वृत्ताने दर घसरले होते.
- चंद्रशेखर पाटील, व्यापारी
गतवर्षी सोयाबीनचे पीक खराब झाल्याने बाजारात अपेक्षित पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे बाजारात सोयाबीनचा तुटवडा निर्माण होत आहे. तसेच पशुखाद्यामध्येही याचा जास्त प्रमाणात वापर होतो. याकरिताही मागणी वाढल्याने दरात पुन्हा वाढ होत आहे.
- रमेश मुंधडा, व्यापारी
बाजार समितीत आवक शून्य
सोयाबीनचे दर दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु खरीप हंगाम सुरू असल्याने सध्या बाजार समितीत माल विक्रीस येत नाही. शनिवारी बाजार समितीत सोयाबीनची आवक झाली नाही. तर शुक्रवारी सोयाबीनला ९ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
बाजारात येण्यास अडीच महिने बाकी!
सोयाबीनचे दर पुन्हा वाढत असले तरी हे दर किती दिवस टिकून राहतात, याची शाश्वती नाही. शेतातील सोयाबीनला बाजारात येण्यासाठी दोन-अडीच महिने बाकी आहे. काही ठिकाणी उशिरा पेरणी झाल्याने माल बाजारात येण्यास आणखी उशीर होण्याची शक्यता आहे.