अकोला, दि. १ : यावर्षी पावसाळा समाधानकारक झाल्याने सर्वच पिकांची जोमदार वाढ झाली आहे. सोयाबीन पिकाची अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली; पण पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने शेंगांचे प्रमाण हवे त्या प्रमाणात नसल्याने यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यावर्षी वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने पेरण्यांना हा पाऊस पोषक ठरला. जुलै-ऑगस्ट महिन्यातच पावसाने जवळपास सरासरी गाठली. पिकांची वाढही जोमदार झाली; पण ऐन पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आली असताना पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने खरीप पिकांवर दुष्परिणाम होत असून, सोयाबीनचे पीक अनेक ठिकाणी पिवळे पडले आहे.पश्चिम विदर्भातील ३२ लाख हेक्टरपैकी साडेचौदा लाख हेक्टरवर यावर्षी सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीनचे पीक ७0 टक्के शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. ज्या शेतकर्यांनी १0 जुलैनंतर पेरणी केली तेथे हे पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. शेंगा धरण्याच्या अवस्थेतच पावसाने दडी मारली आहे. परिणामी, सोयाबीनच्या दाण्याचा आकार कमी राहण्याची शक्यता आहे. हलक्या जमिनीतील सोयाबीनवर अधिक परिणाम होऊ शकतो, तर भारी, काळ्य़ा जमिनीतील शेंगांवर या तुलनेत कमी दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. मागील तीन, चार वर्षांनंतर यावर्षी सोयाबीन पीक जोमदार वाढल्याने शेतकरी आनंदित आहे; पण पाऊस त्यांच्या आनंदावर विरजण टाकतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.मागील दहा वर्षात २00७ मध्ये सोयाबीन पीक बर्यापैकी होते, त्यानंतर २0१३ मध्ये या पिकाने शेतकर्यांना दिलासा दिला; पण ही दोन वर्षे सोडली तर मात्र सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत शेतकर्यांच्या पदरी निराशाच आली.- सोयाबीन परिपक्वतेच्या अवस्थेत असताना नेमकी पावसाने दडी मारल्याने पिकावर पाण्याचा ताण पडला.परिणामी, बरड शेतातील शेंगाचे प्रमाण कमी झाले.- डॉ. मोहन खाकरे ,ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ,डॉ. पंदेकृवि,अकोला.
सोयाबीनचे उत्पादन घटणार!
By admin | Published: September 02, 2016 12:56 AM