लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मागील १५ दिवसांच्या तुलनेत गत आठवड्यात सोयाबीनचे दर ३१५० ते ३४०० रुपयांदरम्यान राहिल्याने बाजारातील चढउतार शेतकरी अनुभवत आहेत. सोयाबीनच्या दरातील वाढ ही मध्यम व मोठ्या शेतकºयांच्या पथ्यावर पडत आहे.वाशिम जिल्ह्यात यावर्षी पावणे तीन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. मध्यंतरी पावसाने खंड दिल्याने या पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अनेक शेतकºयांना सोयाबीनवर केलेला खर्चही वसुल झाला नाही. त्यातच सुरुवातीला बाजारात २१०० ते २४०० रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण होते. शासनाने नाफेडसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी सुरू केली असली तरी, त्या ठिकाणी लावण्यात येणारे जाचक निकष पाहता अनेक शेतकरी हे बाजार समिती व खासगी व्यापाºयांना सोयाबीन विकतात, हा नेहमीचाच अनुभव आहे. साधारणत: १५ दिवसांपूर्वी सोयाबीनला २७०० ते ३१०० रुपयांदरम्यान बाजारभाव होते. गत आठवड्यात सोयाबीनला ३१५० ते ३४०० रुपयादरम्यान बाजारभाव मिळाले. शासनाने सोयाबीनला ३३९९ रुपये हमीभाव जाहिर केलेला आहे. हमीभावाच्या आसपास बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला दर मिळत असल्याने गत आठवड्यात अनेक शेतकºयांनी बाजार समित्यांमध्येच सोयाबीनची विक्री करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
धान्य काटे तपासणीला ‘कोलदांडा’!जिल्ह्यातील शेकडो व्यापाºयांकडून थाटण्यात आलेल्या खासगी दुकानांमधून शेतमालाची खरेदी केली जाते. मात्र, व्यापाºयांकडे असलेल्या धान्य काटे आणि वजनमापांच्या तपासणीला वैधमापन शास्त्र विभागाकडून ‘कोलदांडा’ दिला जात असल्याने शेतकºयांच्या फसवणूकीची शक्यता नाकारता येत नाही. धान्य काटे ‘फॉल्टी’ असणे, धान्य खरेदीनंतर लिहिल्या जाणाºया पट्टींमध्ये त्रुट्या ठेवणे, घट्टी लावणे, आदी कारणांमुळे शेतकºयाला नुकसान सोसावे लागते. वैधमापन शास्त्र विभागाने खासगी व्यापाºयांकडे असलेल्या धान्य काटे व वजनमापांची नियमित तपासणी करावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे वाशिम तालुकाध्यक्ष महादेव सोळंके यांनी केली.