अकोला : कधी नव्हे एवढा विक्रमी दर यंदा सोयाबीनला मिळत आहे. जिल्ह्यात सोयाबीनला शुक्रवारी सर्वाधिक १० हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला; मात्र शेतकऱ्यांनी जवळचे सर्व सोयाबीन विकले असून या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही; परंतु सोयाबीनची साठवणूक करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांचे चांगले फावले आहे.
जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात येत असते. चांगले उत्पन्न मिळत असल्याने दरवर्षी या क्षेत्रात वाढ होत आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन खराब झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पडलेल्या भावात सोयाबीन विकले. सुरुवातीला तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला; मात्र नंतर सोयाबीनच्या दरात दिवसागणिक वाढ होत आहे. शेतात सोयाबीनचे पीक उभे आहे आणि बाजारात सोयाबीनला १० हजार रुपये दर मिळत आहे. हातात शेतमाल नाही, पण सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. बाजार समितीत सोयाबीनचा दर १० हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मागील काही दिवसांमध्ये या दरात अडीच हजार रुपयांनी वाढ झाली; मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसून व्यापाऱ्यांना होणार असल्याचे दिसून येते.
असे वाढले दर
१५ जुलै ७५००
१६ जुलै ८०००
२६ जुलै ८४००
२८ जुलै ९३००
३१ जुलै ९५००
६ ऑगस्ट १००००
कृत्रिम तेजी असल्याचा अंदाज
पावसाळा सुरू असल्याने शेतकऱ्यांजवळ शेतमाल शिल्लक नाही; मात्र मागील महिनाभरात सोयाबीनचे दर झपाट्याने वाढत आहे. ही कृत्रिम तेजी असल्याचे काही छोट्या व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
शेतकरी म्हणतात...
यंदा मशागतीसोबत बियाणे, खतांचे दर वाढले आहे. त्यामुळे शेतीचा खर्चही वाढला आहे. सोयाबीनची १२ एकरात पेरणी केली असून बाजारात सध्या सोयाबीनला चांगला दर मिळतो; परंतु या दरवाढीचा फायदा नाही.
- प्रकाश बर्दे, शेतकरी, वणी रंभापूर
जागतिक बाजारपेठेच्या दराचा शेतकऱ्यांना फायदा नाही. आता सोयाबीनला विक्रमी दर मिळत असले तरी शेतकरी सोयाबीन विकून बसले आहे. ऐन हंगामात बाजारात शेतमालाला दर नसतो. यंदा तरी चांगला दर मिळावा.
- प्रकाश दांदळे, शेतकरी, खिरपुरी