अकोला : यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवत आहे. महाबीजचे बियाणे संपल्याचे फलक लागल्याने कोणाकडे घरचे सोयाबीन बियाणे आहे का? अशी माहिती शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे ४ हजार क्विंटल घरचे सोयाबीन बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. यातील काही बियाणांची विक्री झाली आहे. तुटवड्याची स्थिती वाशिम जिल्ह्यातही आहे. त्यामुळे तेथील शेतकरी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून घरचे बियाणे खरेदी करत आहेत.गेल्यावर्षी सोयाबीन बियाणांच्या उगवणशक्तीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अतिपावसाने सोयाबीन पीकही खराब झाले होते. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन राखून ठेवण्याचे आवाहन केले होते; परंतु दर चांगले असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले. तरी दीड लाख शेतकऱ्यांकडे बियाणे शिल्लक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे होते. यंदा खासगी कंपनीच्या सोयाबीन बियाणांचे दर वाढल्याने महाबीजकडून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती; मात्र महाबीजनेही निराशा केली. जिल्ह्याला केवळ ११ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा केल्याने बियाणांसाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. आता तेही बियाणे शिल्लक नसून शेतकऱ्यांकडे घरचेही बियाणे किती? हा प्रश्न पडला आहे. कृषी विभागाने ४०१९ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी शिल्लक असल्याचे सांगितले व काही बियाणे इतर शेतकऱ्यांना विकल्याचेही सांगण्यात आले. यामधील बियाणे आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगलीच वाताहात होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी असलेले बियाणे
४,०१९ क्विंटल
किती शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी बियाणे
२१८
सर्वाधिक बियाणे कोणत्या तालुक्यात
बार्शीटाकळी २,४८१ क्विंटल
घरच्या बियाणांवर व्यापाऱ्यांचा डोळा!
कृषी सेवा केंद्रांवर मिळणाऱ्या खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग आता घरच्या बियाणांकडे वळला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे असलेल्या घरच्या बियाणांकडे आता व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. हे बियाणे खरेदी करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाच जादा दरात विकण्याचा घाट घालण्यात येत आहे.
महागडे बियाणे खरेदीशिवाय पर्याय नाही!
घरचे विक्रीसाठी असलेले बहुतांश बियाणे विक्री झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता खासगी कंपनीचे महागडे बियाणे खरेदी केल्याशिवाय पर्याय उरला नाही. सद्यस्थितीत खासगी कंपनीचे बियाणे ३३००-३५०० रुपये दराने मिळत आहे.
बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडूनही खरेदी
अकोला जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांकडून वाशिम सोबत बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन बियाणे विकत घेतले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील सोयाबीन बियाणे विकत घेतल्या जात आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या घरच्या सोयाबीन बियाण्यांचा लाभ घ्यावा.
- डॉ.कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी