खेट्री : पातूर तालुक्यातील उमरा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याने पेरलेल्या सोयाबीनला शेंगा लागल्याच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्याने बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे.
उमरा येथील अल्पभूधारक शेतकरी विनोद मधुकर चिपडे यांची उमरा परिसरात शेत स. न.८८/४ अ दोन एकर असून, त्यामध्ये जून महिन्यामध्ये सोयाबीन पिकांची पेरणी केली होती. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगरकिनी येथील एका कृषीसेवा केंद्रातून एका कंपनीची सोयाबीन बियाणे खरेदी करून जून महिन्यामध्ये पेरणी केली होती. पेरणी केल्यानंतर सोयाबीनचे बियाणे चांगले उगवले, मात्र त्याला शेंगाच लागल्या नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्याजाने पैसे घेऊन बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, सोयाबीनला शेंगा लागल्याच नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यानेच सोयाबीनला शेंगा लागल्या नसल्याचा आरोप शेतकरी विनोद चिपडे यांनी कृषी विभाग, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे तक्रारीतून केला असून, भरपाईची मागणी केली आहे. कृषी विभागाने पंचनामा केला आहे.
३० हजार रुपयांचा खर्च गेला पाण्यात
अल्पभूधारक शेतकरी विनोद चिपडे यांनी दोन एकरांमध्ये सोयाबीन पिकांची पेरणी केल्यापासून, ३० हजार रुपयांचा खर्च लागला आहे. परंतु बियाणे निकृष्ट निघाल्याने सोयाबीनवर लावलेला ३० हजार रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
शेतकऱ्याची तक्रार प्राप्त झाली असून, तक्रारीवर पंचनामा करण्यात आला आहे. पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठांकडे सदर करण्यात आला आहे.
- एस. एस. पवार, कृषी सहय्यक, उमरा
-----------
सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने सोयाबीनला शेंगा लागल्या नाही, ३० हजार रुपयांचा लावलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे संबंधितांना दिलेल्या निवेदनातून बियांणे कंपनीविरुद्ध कारवाई करून नुकसानभरपाई द्यावी.
- विनोद मधुकर चिपडे, शेतकरी, उमरा
190921\0605img-20210918-wa0168.jpg
फोटो