अकोला : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने वायदे बाजारात सोयाबीनच्या व्यवहारावर बंदी घातली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर कोसळणार असल्याच्या अफवा उठल्या होत्या. परंतु, दोन दिवसानंतरही बाजार समितीत सोयाबीनचे दर कायम आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सोयाबीनला ६२००-६४०० रुपये सर्वसामान्य दर मिळाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.वायदे बाजारातील ज्या त्रुटी होत्या, त्या दूर करण्याची गरज होती. परंतु, हे न करता केंद्रीय अर्थ मंत्रालयाने थेट बाजारातील संधीच नाकारली आहे. दोन दिवसांआधी सोयाबीन, सोयातेल, क्रूड पामतेल, मूग, हरभरा व सरकीच्या वायदे बाजारावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीत माल विकणे हा पर्याय शिल्लक होता. या निर्णयाने शेतकरी पुरता कोंडीत पकडला गेल्याने यावर शेती तज्ज्ञ व व्यापाऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात आला. मात्र, या निर्णयाला दोन दिवस झाल्यानंतरही बाजार समितीत सोयाबीनचे दर जोरात आहेत. बाजार समितीत गुरुवारीही सोयाबीनला चांगला दर मिळाला.
२०० रुपयांची दरवाढ
कृषी उत्पादनांच्या वायदा बाजारातील व्यवहारास बंदी घालणारा निर्णय जाहीर केल्यानंतर गुरुवारी बाजार समितीत सोयाबीनचे दर २०० रुपयांनी वाढले. बुधवारी ६१००-६२०० विकल्या गेलेले सोयाबीन गुरुवारी ६४०० पर्यंत पोहोचले होते.
सीड सोयाबीनला ६८०० रुपये दर
बाजार समितीत सीड सोयाबीनच्या दरांवर परिणाम दिसून येत नाही. प्रक्रिया उद्योगांकडून मागणी असल्याने गुरुवारी सीड सोयाबीनला ६८०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला.
शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये!
- सोयाबीनला बाजार समितीत चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून न जाता रोजच्या रोज भाव बघून गरजेपुरता माल विकावा.
-