अकोला: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणार्या प्रवाशांच्या सुविधेकरिता मध्य रेल्वे प्रशासनाने ४ व ५ डिसेंबर रोजी नागपूर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई) दरम्यान तीन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) मुंबईला जाणार्या भाविकांच्या सुविधेकरिता दरवर्षी मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने विशेष गाड्या सोडल्या जातात. या काळात मध्य रेल्वे मार्गावर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने ४ व ५ डिसेंबर रोजी नागपूर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई) दरम्यान तीन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 0१२९२ क्रमांकाची ही पहिली विशेष गाडी ४ डिसेंबर रोजी रात्री ११.५५ वाजता नागपूर रेल्वे स्थानकाहून रवाना होईल व दुसर्या दिवशी दुपारी १.३५ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचेल. 0१२९४ क्रमांकाची ही दुसरी विशेष गाडी ५ डिसेंबर रोजी सकाळी ७.५0 वाजता नागपूरहून सुटेल व रात्री १२.१0 वाजता मुंबईला पोहोचेल. तिसरी विशेष गाडी क्रमांक 0१२९६ ही ५ डिसेंबर रोजी दुपारी ३.५५ वाजता नागपूर रेल्वे स्थानकाहून सुटेल आणि ६ डिसेंबर रोजी सकाळी ११.३५ वाजता मुंबईला पोहोचेल. पाच अनारक्षित डब्यांसह १२ सामान्य डबे असलेल्या या विशेष गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण व दादर या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेचे विशेष नियोजन
By admin | Published: December 04, 2015 2:34 AM