अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत असून, १० ग्रामपंचातींची निवडणूक अविरोध झाल्याने, २१४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेत कोरोनाबाधितांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये १० ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध निश्चित झाल्याने, जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेत कोरोनाबाधित असलेल्या; मात्र क्वारंटाईन असलेल्या मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या सहकार्याने ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाबाधितांच्या मतदानासाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळेत मतदान केंद्रांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यात येणार आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या मतदानासाठी ठरवून देण्यात आलेल्या वेळेत इतर मतदारांना मतदानासाठी प्रवेश देण्यात येणार नाही.
कोरोनाबाधितांसाठी मतदानाची वेळ राखीव!
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये २१४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये कोरोनाबाधितांना मतदान करता यावे, यासाठी सायंकाळी ५.३० वाजतानंतरची वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. ही प्रक्रिया अर्धा तास किंवा तासभर चालणार असून, या कालावधीत मतदान केंद्रांवरील कर्मचारी पीपीई किटमध्ये आपली जबाबदारी पाडणार आहेत.