अकोला: मतदार नोंदणी विशेष मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी जिल्ह्यातील १ हजार ६८० मतदान केंद्रांवर मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी मतदारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये १ हजार २७४ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर ज्या मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत, अशा पात्र मतदारांना मतदार यादीत नावे नोंदविण्याची शेवटची संधी म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात २ व ३ मार्च रोजी मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या दुसºया दिवशीही (रविवारी) जिल्ह्यातील १ हजार ६८० मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना क्र .६ चे अर्ज मतदारांकडून स्वीकारण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात १ हजार २७४ नवीन मतदारांची मतदार यादीत नावे नोंदविण्यात आली.मतदारसंघनिहाय अशी आहे मतदार नोंदणी!मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत रविवारी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत १ हजार २७४ मतदारांच्या नावांची नोंदणी करण्यात आली. त्यामध्ये अकोला पश्चिम मतदारसंघात -४११, अकोला पूर्व मतदारसंघात -२६२, अकोट मतदारसंघात -७९, बाळापूर मतदारसंघात -२२९ आणि मूर्तिजापूर मतदारसंघात २९३ मतदारांची नोंदणी करण्यात आली.जिल्हाधिकारी, तहसीलदारांनी दिल्या मतदान केंद्रांना भेटी!मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत रविवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बार्शीटाकळी व कान्हेरी सरप येथील मतदान केंद्रांना भेट देऊन मतदार नोंदणीच्या कामाची पाहणी केली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांनी पातूर तालुक्यातील काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या असून, जिल्ह्यातील सातही तालुक्यांत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी संबंधित तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदार नोंदणीच्या कामाची पाहणी केली.