अकोला : क्षयरुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. क्षयरोग नियंत्रणासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत किती क्षयरुग्णांवर उपचार सुरू आहेत, तसेच क्षयरुग्णांचा शोध घेण्यासाठी राज्यात सर्वेक्षण करण्यात येत आहे. ही मोहीम केंद्रीय टीबी विभागातर्फे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चमार्फत राबविण्यात येणार आहे.देशभरात क्षयरुग्णांच्या रुग्णांची संख्या समजावी, यासाठी प्रत्येक ठिकाणी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राज्यात या सर्वेक्षणाला पुण्यातून प्रारंभ झाला असून, एक विशेष व्हॅन निघाली आहे. क्षयरुग्णांची संख्या जाणून घेण्यासाठी तब्बल ६२ वर्षांनी या प्रकारचे सर्वेक्षण केले जात आहे. पुण्याहून निघालेली ही व्हॅन राज्यात सर्वत्र फिरणार असून, क्षयरुग्णांचा शोध घेणार आहे. या विशेष मोहिमेंतर्गत क्षयरोगावर नियंत्रणासाठी प्रतिबंध आणि उपचारांवर भर दिला पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने ‘आयसीएमआर’सोबत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५ पर्यंत देशातून क्षयरोग हद्दपार करण्याचे उद्दिष्ट शासनाने समोर ठेवले असून, त्यानुषंगाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यांतर्गत क्षयरोगाच्या प्रसाराचे कारण स्पष्ट झाल्यास त्यावर धोरण बनविणे सोयीस्कर होणार आहे. या विशेष मोहिमेंतर्गत देशभरातील ६२५ जिल्ह्यांमधील पाच लाख लोकांच्या तपासणीचे उद्दिष्ट आहे.अशी आहे व्हॅन...
- व्हॅनमध्ये ‘सीबीएनएएटी’ मशीन बसविण्यात आले आहे.
- मोबाइल एक्स-रे युनिटची उपलब्धता.
- यासह इतर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा समावेश.
- या माध्यमातून रुग्णांचे सर्वेक्षण केले जाईल.
अकोल्यातही राबविली जाईल मोहीमराज्यातील इतर जिल्ह्यांसोबत अकोल्यातही ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अकोल्यातील दोन गावांची निवड करण्यात येणार आहे; मात्र सर्वेक्षणाचा दिवस अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे लवकरच या गावांची निवड करण्यात येणार आहे.क्षयरोगावर नियंत्रणासाठी ‘आयसीएमआर’ अंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणामुळे क्षयरोगावर नियंत्रणासाठी योग्य धोरण आखण्यास मदत होईल. राज्यातील इतर जिल्ह्यांसोबत अकोल्यातही हे सर्वेक्षण होणार आहे; परंतु सर्वेक्षणाचा दिवस निश्चित झालेला नाही.- डॉ. मेघा गोळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, अकोला.