अकोला : मोर्णा नदीसह परिसरातील जलाशयांचे प्रदूषण टाळण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासनाच्या वतीने नदीच्या काठावरील गणेश विसर्जन कुंड व घाटांची रंगरंगोटी केली जात आहे. याकरिता बांधकाम विभाग व मोटर वाहन विभाग सरसावल्याचे दिसत आहे. शहरात गणेशोत्सवामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. घरोघरी किमान दोन फुट उंच मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
कोरोना संपुष्टात आल्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर मुर्तीच्या उंचीचे निर्बंध नसल्यामुळे अनेक ठिकाणी बारा ते पंधरा फुट उंच मुर्त्या दिसून येत आहेत. दरम्यान, अशा मोठ्या मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी संबंधित मंडळांना शहराबाहेर गांधीग्राम येथील पूर्णा, बाळापूर येथील मन व महेश नदीवर जावे लागणार आहे. दुसरीकडे चार ते पाच फुट ऊंच मुर्ती विसर्जनासाठी मनपा प्रशासनाकडून विसर्जन कुंड तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे बुधवारी दिसून आले. मोर्णा नदीच्या काठावरील मुख्य गणेश घाट व गणेश विसर्जन कुंडांची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आहे.
गर्दी टाळण्यासाठी प्रभागांमध्ये विसर्जन कुंडगणेश घाटावर होणारी गर्दी पाहता महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी प्रभागांमध्ये विसर्जन कुंड तयार करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला. मनपाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे.
मोर्णा नदीच्या काठावर विसर्जन कुंड तयारमनपाच्यावतीने प्रभागांमध्ये विसर्जन कुंड तयार करण्यासाठी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व विविध सामाजिक संघटनांना आवाहन करण्यात आले होते. मनपाकडून महाराणा प्रताप बागेमागील मोर्णा नदीच्या मुख्य घाटावर तसेच हरिहर पेठ, हिंगणा आदी भागात कुंड तयार करण्यात आले आहेत.