लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे हे वार्षिक निरीक्षणासाठी गुरुवारपासून अकोला दौर्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी पोलीस मुख्यालयातील मैदानावर आयोजित दरबारामध्ये जिल्हय़ातील पोलीस कर्मचार्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि पोलीस अधिकार्यांच्या शानदार कवायतीचे निरीक्षण केले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील उपस्थित होते. जिल्हय़ातील पोलीस ठाण्यांचे वार्षिक निरीक्षण करण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे गुरुवारपासून अकोल्यात आले आहेत. गुरुवारी जिल्हय़ातील सर्वच पोलीस निरीक्षकांची त्यांनी बैठक बोलावून, त्यांच्याकडून गुन्हय़ांचा आढावा घेतला. दुपारी पोलीस मुख्यालय मैदानावरील जनता दरबारात त्यांनी पोलीस कर्मचार्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पोलीस कर्मचार्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा योजना राबविण्यासोबतच त्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, यासाठी योजना सुरू करण्याची विशेष पोलीस महानिरीक्षक वाकडे यांच्याकडे विनंती केली. पोलीस कर्मचार्यांनी केलेली विनंती विशेष पोलीस महानिरीक्षक वाकडे यांनी मान्य करून, जिल्हय़ात पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंबासाठी आरोग्यविषयक योजना करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे केल्या. तसेच अनेक पोलीस कर्मचार्यांनी त्यांना काम करताना येणार्या अडचणीसुद्धा त्यांच्यासमोर मांडल्या. विशेष पोलीस महानिरीक्षक वाकडे यांच्या जनता दरबारामध्ये जिल्हय़ातील शेकडो पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
पोलीस लॉनसाठी कर्मचार्यांना सवलत द्या!जनता दरबारादरम्यान काही पोलीस कर्मचार्यांनी त्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी अल्प दरामध्ये पोलीस लॉन मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. मुला-मुलींच्या लग्नासाठी लाख रुपये भाडे द्यावे लागते. पोलीस कर्मचार्यांना तरी त्यासाठी सवलत देण्यात यावी, अशी मागणी पोलीस कर्मचार्यांनी केली. पोलीस कर्मचार्यांची भावना लक्षात घेता, विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे यांनी, पोलीस कर्मचार्यांना लग्नसमारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पोलीस लॉन सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना केली.