अकाेला : उरळ पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील निमकर्दा येथे अवैधरीत्या अमली पदार्थांची माेठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत असल्याची माहिती पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी छापा टाकून दाेन्ही महिलांकडून सुमारे दाेन किलाे गांजा जप्त केला. ही कारवाई साेमवारी दुपारी करण्यात आली असून, महिलांविरुद्ध उरळ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निमकर्दा येथील रहिवासी प्रिया गाेपाल अग्रवाल व सरस्वती गाेपाल अग्रवाल या दाेघी माेठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर विशेष पथकाने साेमवारी दुपारी सापळा रचून कारवाई केली. पाेलिसांनी छापा टाकल्यानंतर महिलांनी सुरुवातीला टाळाटाळ केली, मात्र त्यानंतर महिला पाेलिसांनी झडती घेतली असता प्रिया अग्रवाल व सरस्वती अग्रवाल या दाेघींकडून सुमारे दीड किलाे गांजा व राेख रक्कम असा एकून २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दाेन्ही महिलांविरुद्ध उरळ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.