अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवसेना वसाहत येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर तसेच देशी व विदेशी दारू विक्रीवर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री उशिरा छापेमारी केली. या दोन्ही ठिकाणांवरून सहा जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिवसेना वसाहत परिसरात दारूची अवैधरित्या विक्री होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून संजय देविदास नावथले (वय ३२ वर्षे) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दारुचा साठा जप्त केला. त्यानंतर त्याच्या घरासमोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून कैलास ईश्वर बोदफळे (२४ वर्षे), विठ्ठल मधुकर गीते (२० वर्षे), कैलाश जनार्धन काटकर (४८ वर्षे), गजानन तुकाराम काळबांडे (४२ वर्षे), सतीश केशव वनस्कर (४२ वर्षे, सर्व रा. शिवसेना वसाहत, जुने शहर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगारींविरुद्ध व दारूविक्रेत्यांविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील, पीएसआय स्वाती इथापे व त्यांच्या पथकाने केली.