अकोला : हरिहर पेठ येथील एका घरातून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर बार्शिटाकळी व कान्हेरी सरप येथील दारू विक्रेत्यांवरही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने छापेमारी केली. या तीनही ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हरिहर पेठ येथील रहिवासी संतोष ठाकूर व दीपक तिवारी हे मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूची अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने छापा टाकून सुमारे ३० हजार रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला. त्यानंतर बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्हेरी सरप येथील रहिवासी परिक्षित बाळू नारखेडे वय ३० वर्षे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दारूचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर कान्हेरी येथील सूर्यकांत चंद्रकांत जयस्वाल यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडूनही दारूचा साठा जप्त करण्यात आला. विशेष पथकाने बुधवारी तीन ठिकाणी छापेमारी करून दारूचा साठा जप्त केला. यासोबतच इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.