राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शापित खारपाणपट्टय़ात सिंचन प्रकल्पाची कामे रखडली असून, या भागात गोडे पाणीच उपलब्ध नसल्याने शेती उत्पादनावर तसेच सामाजिक, आर्थिक जीवनावर परिणाम झाल्याचे दिसत आहेत. म्हणूनच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने खापाणपट्टय़ातील सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याचा निर्णय घे तला आहे. त्यासाठीचा आढावाही महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी रविवारी घेतला. कवठा व नया अंदुरा प्रकल्प येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याची आदेश त्यांनी कंत्राटदार आस्थापनेला दिले. खारपाणपट्टय़ातील पाणी समुद्राच्या पाण्यासारखे खारे आहे. आरोग्यासाठी घातक असलेले हे पाणी पिकांवर परिणाम करणारे असल्याने या भागात धरणे व्हावीत, असे सातत्याने प्रयत्न झाले; पण या भागातील भूगर्भात ४0 ते ५0 मीटर खाली खडक नसल्याने धरण होऊ शकत नाही, असे सातत्याने जलसंपदा विभागाच्या विविध तज्ज्ञ समित्यांकडून सांगण्यात येत होते. यावर उपाय म्हणून नवीन तंत्रज्ञान वापरण्याचे ठरले. सुरुवातीला नेर धामणा बॅरेजचे काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात आल्या. अखेर राज्यातीलच कंत्राटदाराला हे काम देण्यात आले असून, मागील आठ वर्षांपूर्वी या बॅरेजच्या कामाची सुरुवात करण्यात आली. खार पाणपट्टय़ातील हे पहिले बॅरेज आहे, जे डायफाम वॉलवर उभे करण्यात आले. सध्या या बॅरेजचे काम थंड बस्त्यात पडले आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात येणार्या नेर धामणा बॅरेजनंतर खारपाणपट्टय़ात बॅरेजची शृंखला तयार करण्यात आली; पण ही सर्व कामे बंद पडली होती. यानुषंगाने रविवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता संजय घाणेकर, अधीक्षक अभियंता अंकुर देसाई यांनी नेर धामणा बॅरेजसह बाळापूर तालुक्यातील कवठा व नया अंदुरा सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतला.त्यांच्यासोबत आमदार बळीराम सिरस्कार,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे होते.कवठा व नया अंदुरा प्रकल्प येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी कंत्राटदार आस्थापनेला दिली. नेर धामणा हा मोठा बॅरेज असून, या बॅरेजच्या पुढच्या कामासाठी ३00 कोटींच्यावर रक्कम लागणार असल्याने सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज आहे. सनदी सचिवस्तरीय अधिकार्यांच्या त्रिसदस्यीय समितीने यासाठीची शिफारस केली असून, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सु प्रमा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे कामही लवकरच मार्गी लागणार असल्याचे वृत्त आहे.
खारपाणपट्टय़ातील बॅरेज, प्रकल्प पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न केले जात असून, कवठा बॅरेजचे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नया अंदुरा, नेर धामणाचेही काम पूर्ण केले जाईल. त्यासाठीचा सुप्रमा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार आहे. अविनाश सुर्वे, कार्यकारी संचालक,व्हीआयव्हीएम, नागपूर.