- सचिन राऊत
अकाेला : शहर व परिसरातील रस्त्यांवर दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमागे मुख्य कारण ओव्हरस्पीड अर्थातच वेगमर्यादेचे उल्लंघन असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. चालू वर्षभरात आतापर्यंत शहर वाहतूक शाखेकडून सुमारे २० लाखांचा दंड या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनचालकांना ठोठावण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांवर वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वेगमर्यादेचे पालन अत्यावश्यक आहे, तरीदेखील बहुतांश दुचाकी, चारचाकीचालक बेफामपणे रस्त्यांवरून वाहने दामटवत अपघातांना निमंत्रण देतात. लाखाे रुपयांचा दंड चालूवर्षी मे अखेरपर्यंत वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनचालकांना करण्यात आला आहे.
शहरात हायस्पीडमध्ये किती वेळ वाचतो?
शहराची हद्द फार मोठी आहे, असे नाही. शहर परिसर सुमारे १५ ते २० किमीच्या परिघात आहे. शहरातील कुठल्याही रस्त्याने गाैरक्षण राेडचा अपवाद वगळता हायस्पीडने वाहन चालविल्यास खूप काही वेळेची बचत होते, असे मुळीच नाही. कारण शहरांतर्गत रस्ते हे फार रुंद नाहीत, शहरात वाहनपार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यांलगत पार्किंगची समस्या कायम आहे. तसेच रस्त्यांलगत विविध फेरीवाल्यांचीही हातगाड्या बघावयास मिळतात. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अतिवेग हा वेळ तर वाचवू शकत नाही. मात्र, अपघातांना नक्कीच निमंत्रण देणारा ठरू शकतो, हे वाहनचालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
यासाठी नेमका दंड काय?
शहर वाहतूक शाखेकडून वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाला प्रत्येकी १ हजारांचा दंड ठोठावला जातो. शहरात मे अखेरपर्यंत ५ हजार ०१४ वाहनचालक सुसाटपणे वाहने दामटविताना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या जाळ्यात अडकले. आतापर्यंत या वाहनचालकांकडून ४ लाख ३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला असून उर्वरित लोकांकडे दंड थकीत आहे. संबंधितांना वाहतूक शाखेने नोटिसा बजावल्या आहेत.
धूम पण नेमकी कशासाठी?
अकाेला शहर हे फार मोठे नाही, यामुळे येथे धूमस्टाइल किंवा अतिवेगाने वाहन चालविण्याची गरजच नाही. मी स्वत: ऑनलाइन फूड डिलिव्हरी बॉय म्हणून दुचाकीने दररोज शहरभर फिरतो. मात्र, कमाल वेगमर्यादा ४० जरी असली तरी पुरेसे होते. यामुळे उगाचच अतिवेगाने वाहन चालवून स्वत:सह दुसऱ्यांचा जीव धोक्यात का घालायचा?
-ॲड. विकास धाेत्रे, तरुण
अति वेगाने दुचाकी असो किंवा चारचाकी चालविणे चुकीचेच आहे आणि हे प्रत्येकाला समजते; मात्र, तरीदेखील काही महाविद्यालयीन वयोगटातील तरुण हौशीला माेल नाही, असे समजून धूमस्टाइल दुचाकी चालवितात. मात्र ते जीवन अनमोल आहे, हेदेखील विसरतात.
-वैभव दुधाळे, तरुण
शहरात गतीची मर्यादा ओलांडल्याची प्रकरणे
२०१९- २३१
२०२०- ४०७२
२०२१- २६०९