अकोला : राजस्थान उच्च न्यायालयाने संथारा अथवा सल्लेखना प्रथेच्या विरोधात दिलेल्या निर्णयाविरुद्ध सोमवार, २४ ऑगस्ट रोजी जैन समाजाच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच शहरातील सर्व जैन बांधवांनी या निर्णयाविरोधात दुपारी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले. राजस्थान उच्च न्यायालयाने जैन धर्मातील संथारा (सल्लेखना) व्रतासंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या विरोधात २४ ऑगस्ट रोजी शहरातील जैन संघटना व संस्थांच्यावतीने अकोला बंदचे आवाहन करण्यात आले होते. शहरातील जैन बांधवांनी पुकारलेल्या या एक दिवसीय बंदला प्रतिसाद देत शहरातील प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. यामध्ये जैन श्वेतांबर मंदिर, श्री वर्धमान स्थानकवासी जैन संघ, सैतवाल दिगंबर जैन मंदिर, शांतीनाथ खंडेलवाल दिगंबर जैन चैत्यालय, संभवनाथ जैन मंदिर, सुपार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, महावीर दिगंबर जैन मंदिर, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, सेनगण दिगंबर, जैन मंदिर नरसिंगपुरा नागदा राजस्थानी समाज, श्री वासुपूज्य स्वामी जैन मंदिर ओसवाल समाज ट्रस्ट, आ. दिगंबर जैन सैतवाल संस्था, भारतीय जैन संघटना, धाकड ज्ञातीय मंडळ आदी जैन संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. मोक्षप्राप्तीसाठी जैन धर्मात संथारा (सल्लेखना) व्रताला महत्त्व आहे. संथारा व्रताची परंपरा अनादी कालापासून सुरू असून, यासंदर्भात जैन धर्मग्रंथात अनेक पुरावे उपलब्ध आहेत. परंतु राजस्थान उच्च न्यायालयाने संथारा म्हणजे आत्महत्येचा प्रकार असून, संथारा व्रत करणे गुन्हा असल्याचा निर्णय दिला आहे.
जैन समाजाच्या अकोला बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: August 25, 2015 2:54 AM