अकोला: अकरावी, बारावीनंतरच्या करिअरची निवड, परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्याबरोबरच आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ध्येय ठरवून जीवनात यशस्वी होण्यासाठीचे यशाचे मंत्र शनिवारी तज्ज्ञांनी शहरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना दिले. निमित्त होते चेन्नईमधील ‘एसआरएम युनिव्हर्सिटी आणि लोकमत’ प्रस्तुत ‘यशाचे मंत्र’ या सेमिनारचे. या कार्यक्रमासाठी पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.
अकोला येथील प्रमिलाताई ओक हॉल येथे आयोजित ‘यशाचे मंत्र’ या शैक्षणिक सेमिनारमध्ये एसआरएम युनिव्हर्सिटीचे माहिती तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. एम. बी. मुकेशकृष्णम, फिजिक्स विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. सभ्यसाची मुखोपाध्याय आणि मोटिव्हेशनल ट्रेनर संदीप चोणकर यांनी मार्गदर्शन केले. या सेमिनारमध्ये डॉ. सभ्यसाची मुखोपाध्याय म्हणाले, उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थांची निवड करताना त्यांची मान्यता, वैशिष्ट्ये, सुविधा, कॅम्पस आणि प्लेसमेंट या बाबी विद्यार्थी आणि पालकांनी जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. एसआरएम युनिव्हर्सिटीमध्ये अँक्टिव्ह लर्निंग, नॉलेज बेस्ड शिक्षण दिले जाते. येथे नॅनो सायन्स, अँटोमोटिव्ह आदी विद्या शाखांसह सेंटर ऑफ एक्सलन्स आहे. परदेशातील विद्यापीठासमवेत एसआरएम विविध शैक्षणिक उपक्रम राबविते. त्यासह विद्यार्थ्यांचे कलागुण, क्रीडा-कौशल्यासह व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. डॉ. एम.बी. मुकेशकृष्णम म्हणाले की, विद्यार्थ्यांनी करिअरबाबत ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी अभ्यासात सातत्य राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. एसआरएम ही वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी आहे. येथे विद्यार्थ्यांना जे वर्गात शिकविले जाते, ते प्रयोगशाळेत प्रत्यक्षात करण्याची संधी दिली जाते. विद्यार्थ्यांना योग्य करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी मदत केली जाते. मोटिव्हेशनल ट्रेनर संदीप चोणकर यांनी विद्यार्थी-पालकांना विविध उदाहरणांच्या माध्यमातून सकारात्मक विचार आणि यशासाठीचा मंत्र दिला. यावेळी ते म्हणाले की, शिस्त म्हणजे वेळेची आखणी असते. ती लक्षात ठेवून कार्यरत राहणे गरजेचे आहे. साचेबद्ध विचार करणे सोडून द्या. मला हे करायचे आहे, ते मनाशी ठामपणे ठरवा. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन एसआरएम युनिव्हर्सिटीतर्फे माहिती तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. एम. बी. मुकेशकृष्णम, फिजिक्स विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. सभ्यसाची मुखोपाध्याय आणि मोटिव्हेशनल ट्रेनर संदीप चोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान डॉ. एम.बी. मुकेशकृष्णम, डॉ. सभ्यसाची मुखोपाध्याय यांनी विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन केले. तसेच त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
राही रघुवंशी प्रथम
- या सेमिनारपूर्वी अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ५0 प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील एक तासाची चाचणी परीक्षा घेण्यात आली.
- स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञानावरील या परीक्षेला विद्यार्थी, विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पेपर सोडविताना त्यांचा कस लागला.
- या चाचणीत प्रथम क्रमांक राही रघुवंशी, द्वितीय अजिंक्य बोबडे, तृतीय यतीन देवरथ अष्टपुत्रे, तर उत्तेजनार्थ धनश्री पवार यांनी मिळविला.
संदीप चोणकर यांनी दिलेल्या टिप्स..
- विचार बदला, जग बदलेल.
- गाफील राहू नका, यशाने हुरळून जाऊ नका.
- संधी ही पटकन ताब्यात घेण्याची गोष्ट आहे.
- अडचणीकडे पाठ फिरवू नका. फिअर अँन्ड फेल्यूअर काढून टाका.
- न्यूनगंडातून बाहेर या. सकारात्मक स्वयंसूचना आणि सेल्फ टॉक करा.