अकोला : जिल्ह्यातील विविध विकास कामांतील यंत्रणांच्या दिरंगाईच्या मुद्यांवर जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक शनिवारी चांगलीच वादळी ठरली. बार्शीटाकळी येथील तालुका क्रीडा संकुलाचा निधी खर्च केला नसल्याने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना एक महिना सक्तीच्या रजेवर पाठविण्यासह विनापरवानगी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अकोला विभागाच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिला.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध विकास कामांमध्ये यंत्रणांकडून दिरंगाईच्या मुद्यांवर लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त करीत नाराजी व्यक्त केल्याने, जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरली. त्यामध्ये बार्शीटाकळी येथील तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन होऊन वर्ष उलटले, ५७ लाख रुपयांचा निधीही प्राप्त झाला; मात्र काम अद्याप सुरू झाले नसल्याच्या मुद्यावर आ. हरीश पिंपळे यांनी संताप व्यक्त केला. या मुद्यावर विचारणा करीत त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानुषंगाने यासंदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हा क्रीडा अधिकारी या दोन अधिकाºयांच्या समितीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देत, क्रीडा संकुलाचा निधी विहित मुदतीत खर्च केला नसल्याने, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचा आदेश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिला. तसेच परवानगी न घेता, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अकोला विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिला.