अकोला: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनापासून तर १४ एप्रिल भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत सुमारे तीन हजार घरांसमोर विषाणुमुक्तीसाठी निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी करण्यात आली. प्रभाग तीन मधील नागरीकांच्या आरोग्य रक्षणासाठी कोरोना विषाणू मुक्त वातावरण व अंगण होण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करण्यात आले.
सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाची फवारणी करत विषाणू मुक्तीचा यशस्वी प्रयत्न केला गेला अशी माहिती रश्मि देव यांनी दिली. दिवंगत नगरसेविका अॅड.धनश्री देव यांच्या कोरोना संसर्गातून झालेल्या निधनानंतर प्रभागातील कोणावर ही परिस्थिती ओढावू नये. म्हणून हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
घरात प्रवेश करताना अंगण व रस्त्यावर विषाणू नसावा. रस्त्यावरचा विषाणू घरात जाऊ नये यासाठी प्रभागातील अंतर्गत रस्ते,आंगण आणि सर्व्हिस लाईन्स मध्ये ही फवारणी करण्यात आली. स्थानिकांनी या फवारणीचे जोरदार स्वागत व सहकार्य केले. कोरोना विषाणूजन्य आजार असून श्वसनरोग आहे. हा आजार माणसं शिंकली, खोकली तर त्यामुळे उडणार्या तुषारांमुळे पसरतो. वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागावर कोरोनाचे विषाणू बराच काळ टिकून राहतात. त्यामुळे अशा दूषित पृष्ठभागाशी थेट संपर्क आल्यास आजार संक्रमित होवू शकतो. मात्र या विषाणूंचा नायनाट करण्यासाठी रासायनिक जंतुनाशकांचा वापर करणे सर्वात परिणामकारक आहे. या प्रभावी उपायामुळेच सर्वजण संक्रमणापासून दूर राहू शकणार आहेत.रस्त्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली.सोडियम हायपोक्लोराईट वापरून सार्वजनिक स्थळांचे निर्जंतुकीकरणासाठी प्रयत्न केला जात आहे.
या भागात केले निर्जंतुकीकरण
प्रभाग तीन मधील ज्योतीनगर, प्रसाद कॉलनी, केला प्लॉट, अमृत सोसायटी, बिर्ला ए,बी,सी कॉलनी, गड्डम प्लॉट, न्यु तापडीया नगर, पंचशील नगर, शंकर नगर, गुप्ते रोड, दिवेकर आखाडा, निर्मल नगर, चैतन्य नगर, दुबे वाडी प्रभागातील सर्व मंदिरे, बौध्द विहार येथे विशेष फवारणी करण्यात आली. आधुनिक पध्दतीने सुमारे तीन हजार घरांसमोर ही फवारणी केल्या गेली. नागरीकांनी या फवारणीचे व अभियानाचे स्वागत केल्याची माहिती रश्मि देव यांनी दिली. कोरोना काळात मास्क लावणे, लस घेणे यासाठीची जनजागृती करण्यात येत आहे. जनकल्याणाचे काम सुरु राहील असे ही रश्मि देव म्हणाल्या.