अकोला : समाजातील वंचित, गोरगरीब नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना उत्तम प्रकारचे उपचार मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गोरगरिबांच्या जीवनमानात बदल होणार आहे. त्यामुळे ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लोकार्पण समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, नागपूर येथील सहायक आयुक्त कुलदीप त्रिवेदी, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, डॉ. अश्विनी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी झारखंड राज्यातील रांची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे देशपातळीवरील झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रक्षेपण यावेळी सभागृहात दाखविण्यात आले. आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत गंभीर आजारांसह १ हजार ३०० रोगांवर उपचार करण्यात येणार असून, पूर्णपणे मोफत असणारी ही योजना आरोग्य सेवेतील महत्त्वाचा टप्पा आहे. राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना सोबतच ही योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगत, ही ऐतिहासिक योजना जिल्ह्यात सर्वांनी मिळून यशस्वी करण्याचे आवाहनही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी केले. कार्यक्रमात निवडक लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात या योजनेच्या ई-कार्डचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आरती कुलवाल यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडीसेविका, आरोग्य मित्र, परिचर्या प्रशिक्षण केंद्रांच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.