अकोला : वडील मोची काम करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या वडिलांच्या स्वप्नांना पंख देत गणेशने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण घेत यश मिळविले आहे.घरची परिस्थिती हलाखीची असली, तरी मुलांना चांगले शिक्षण द्यावे, असे स्वप्न पाहत धनराज डामरे हे रात्रंदिवस एक करीत दोन्ही मुलांना शिक्षण देत आहेत. त्यांचा मोठा मुलगा गणेश हा मांगीलालजी शर्मा विद्यालयाचा विद्यार्थी आहे. यंदा दहावीचे वर्ष, त्यात शिक्षणाचा खर्च अन् संसाराचा गाडा चालविणे सोपी गोष्ट नाही; पण कुटुंबाची काटकसर अन् दिवसाची रात्र करीत वडील धनराज डामरे मोची काम करू लागले. मुलांनी मोठे होऊन त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे आणि उच्च पदावर जावे, असे स्वप्न बघणाºया वडिलांना गणेशच्या आईनेही तितकीच साथ दिली. पालकांचे स्वप्न साकारत गणेशने इयत्ता दहावीत ९१.२० टक्के गुण मिळवून या प्रवासातील पहिली झेप घेतली. त्याच्या या यशामुळे वडिलांच्या स्वप्नांना नवे पंख फुटले असून, गणेशने आणखी शिकावे, अशी त्यांची इच्छा आहे.ध्येय सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचेपालकांच्या स्वप्नांना पंख देत इयत्ता दहावीत उत्तीर्ण होऊन गगन भरारी घेणाºया गणेशला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे आहे. गणेशचे हे ध्येय असून, या दिशेने त्याची वाटचाल राहणार असल्याचे गणेशने बोलताना सांगितले.