अकोला-अकोला जिल्ह्यातील बाळापूरच्या राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेत बस चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच, बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्हातील बाळापूर जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शेळद फाट्याजवळ दुपारी एक वाजता बाळापूरवरुन अकोलाकडे जाणाऱ्या एस.टी बस (क्रं. MH 40 AQ 61 6O )ची व अकोलावरुन बाळापुरकडे जाणाऱ्या कोळशाचा ट्रक (क्रं UP 7O GT O515)शी समोरा समोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर अचानक एसटीने आणि कोळशाने भरलेल्या ट्रकने पेट घेतला. यात ट्रक व एसटी बस जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं तर पोलिसांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
या घटनेत एसटी चालकाला गंभीर दुखापत झाली असून, सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर अवस्थेत चालकाला अकोला येथील रुग्णालय दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या अपघातानंतर बाळापूर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. बाळापूर पोलीसांनी वेळीच घटणास्थळ गाठून वाहतूक सुरळीत करतांनाच बसमधील प्रवाशांना उपचारा साठी दवाखाण्यात पाठविले.